वैद्यकीय शिक्षण न घेता अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होतो. सर्वसामान्य लोकांना अशा बनावट डॉक्टरांबद्दल फारशी माहिती नसते. त्यामुळे पोलीस व आरोग्य विभागाने मुन्नाभाईंना शोधून कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.
शहरासह जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात वर्तमानपत्रातून जाहिराती देऊन बनावट डॉक्टर लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत सर्वसामान्य रुग्णांवर अघोरी उपचार करतात. अशा उपचारांमुळे अनेकांच्या प्राणावर बेतले जाते. या पाश्र्वभूमीवर जिल्हय़ातील बनावट डॉक्टरांवर कारवाईच्या मोहिमेला गती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी केले. बनावट डॉक्टर पुनर्वलिोकन समितीच्या बठकीत केंद्रेकर यांनी बनावट वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यास आरोग्य विभागासह यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तालुका पातळीवर संबंधित पोलीस ठाणे व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील मुन्नाभाईंना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, नागरिकांना जागरूक करावे, असे आदेश दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक, शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड आदी उपस्थित होते.