गेल्या चार पाच दिवसांपासून गोंदिया जिल्ह्य़ात पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून या आल्हाददायक वातावरणाचा आनंद सर्वसामान्य नागरिक घेत आहेत, मात्र या वातावरण शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. जिल्ह्य़ात काल रात्री ८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ातही सलग दोन दिवस झालेल्या अकाली पावसामुळे कापूस, हरभरा, गहू व तुरी या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे वरोरा तालुक्यात नुकसानीचा आकडा सर्वाधिक असल्याने कास्तकार पुरता नागवला आहे.
खरीप हंगाम समाधानकारक गेलेला नसतांना चंद्रपूर जिल्ह्य़ात अकाली पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या जिल्ह्य़ात शुक्रवार व शनिवारी काही तालुक्यांमध्ये अकाली पावसाने हजेरी लावली.
या पावसाचा सर्वाधिक फटका गहू व कापसाला बसला आहे. त्यापाठोपाठ हरभरा, तुरी व भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. जवळपास सर्वच तालुक्यात हा पाऊस झाल्याने नुकसानीचा आकडा मोठा असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. वरोरा तालुक्यातील काही भागात तर अर्धा तास गारपीट सुरू होती. त्यामुळे कापूस व तुरीसह या तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या घरांची पडझड सुध्दा झाली. राजुरा, भद्रावती, वरोरा, गोंडपिंपरी या तालुक्यात तुरीच्या पिकासोबत गहू, हरभरा आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. राजुरा तालुक्यात सास्ती, गोवरी, सुब्बई या परिसरात गहू, हरभरा, ज्वारी व तुरीच्या पिकाला फटका बसला असून चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्याच्या या पावसामुळे डोळ्यात अश्रू दाटले आहेत.
वर्धा नदी काठावरील पोवनी, काथरा, गोयेगाव, चिंचोळी, निर्ली, चार्ली, पांढरपौनी, वरोडा, पेल्लोरा, कढोली या गावांनाही अकाली पावसाचा फटका बसला असून नुकसानीचा नेमका आकडा दोन दिवसाने कळेल, असे कृषी विभागाने सांगितले
गोंदिया जिल्ह्य़ात शनिवार, १६ फेब्रुवारीच्या रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली, तसेच आज, मंगळवारीही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. असे ढगाळ वातावरण  कडधान्यांसह पऱ्हे भरणी झालेल्या रबीच्या धानपिकांसाठी अपायकारक ठरले आहे. कडधान्यांवर कीडीच्या प्रादुर्भावासह उन्हाळी धान्याच्या मळणीचे काम आटोपले असून शेतकऱ्यांनी शेतात हरभरा, मूग, तूर, लाखोळी, गहू, पोपट, जवस आदी कडधान्ये लावली आहेत. सोबतच रब्बी धानाच्या पऱ्हे पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. यातील तूर, मूग, जवस आदी पिके ऐन बहरात आलेले असतानाच गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्य़ात रिपरिप पावसासह ढगाळ वातावरण असल्याने हरभरा, मूग, तूर, लाखोळी, गहू, पोपट, जवस आदी कडधान्यांवर कीडींनी आक्रमण केले आहे.
हलक्या जातीच्या तुरींचे पीक काही शेतकऱ्यांनी काढले असले तरी भारी जातींची तूर आजही शेतात डोलत आहे. तुरींवर अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
याबरोबरच बहरात असलेल्या हरभऱ्यालाही फटका बसला असून हे पीक मरायला सुरुवात झाली आहे, तर मोठय़ा प्रमाणात लावलेले लाखोळीचे पीक काळे पडत आहे.
जिल्ह्य़ात सिंचनाचे मोठे स्त्रोत उपलब्ध असले तरी शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ५० टक्के शेती आजही पावसावरच अवलंबून आहे. कर्जबाजारी होऊन बळीराजाने कडधान्यांची महागडी बियाणे खरेदी केली. नांगरणी, वखरणी, करून पेरणी केली. कडधान्ये जोमात वाढली, परंतु ऐन बहरात निसर्गाने छळ मांडला. यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. काही शेतकऱ्यांनी हिरव्या हरभऱ्याची विक्री कवडीमोल भावात करण्याचा सपाटा लावला आहे.