दिवाळी म्हणजे मनसोक्त खरेदी, फराळाची अवीट गोडी अन् फटाक्यांच्या आतषबाजी! याचबरोबर काहीजण वेगळं काहीतरी करण्याची संधी घेतात.. काहीजण कल्पनाशक्तीला ताण देऊन नावीन्यपूर्ण सजावट करतात, दिवाळी अंकाच्या रूपाने शब्दरूपी फराळ देतात किंवा दुर्लक्षित घटकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा आपापल्यापरीने प्रयत्न करतात. हेच या दिवाळीच्या निमित्ताने शहरात दिसले. त्यातूनच या वेळची दिवाळी बनली खास अन् आगळीवेगळी!
परिस्थितीमुळे ज्यांना दिवाळीचा आनंद घेणे शक्य होत नाही, त्यांना तो देण्याचा प्रयत्न करणारेही अनेक जण असतात. ‘जिगिषा’ या सामाजिक संस्थेमार्फत ‘बाल शिक्षण मंच’ या संस्थेच्या मुलांसाठी आनंदमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रंगकर्मी प्रकाश पारखी यांनी मुलांसाठी ‘नकलानगरी’ हा कार्यक्रम सादर केला. ‘जिगिषा’ने प्रकाशित केलेल्या ‘बाप नावाचे आभाळ’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन आपल्या हस्ते करण्याचे अप्रूपही या वेळी चिमुकल्यांनी अनुभवले. कसबा पेठेतील ‘वीर मित्र मंडळा’ ने ममता फाऊंडेशनमधील एचआयव्हीबाधित मुलांसोबत दिवाळी साजरी केली. नेदरलँडहून आलेल्या विद्यार्थिनींनीही या आनंद सोहळ्यात भाग घेतला. ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’ तर्फे  सहकारनगरमधील बागुल उद्यानात दृष्टिहीन बांधवांसाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फुलबाज्या उडवीत आणि प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांच्या बासरीचे स्वर कानात साठवीत दृष्टिहीन बांधवांनी दिवाळी पहाट मनातही साठविली. ‘नीलकंठेश्वर शिक्षण संस्थे’ च्या वतीने राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गरजूंना दिवाळी फराळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. ‘साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळा’ तर्फे निराधार बांधवांना अभ्यंग स्नान करण्याची संधी देण्यात आली तसेच त्यांना नवे कपडे देऊन त्यांच्यासोबत फराळही करण्यात आला. ‘संतश्री आसारामजी बापू सत्संग मंदिर’ आणि ‘श्री योग वेदान्त सेवा समिती’ यांच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यसनमुक्ती, तणावमुक्ती आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आध्यात्मिक साधनेचे महत्त्व सांगण्यात आले.
महाराष्ट्र नाणकशास्त्र परिषदेतर्फे चतु:श्रुंगी मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात यामित्ताने दुर्मिळ चलनांचे अनोखे प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनात पन्नास दशलक्ष डॉलरपासून एक पैशाच्या पाव भागापर्यंतची  कागदी चलने तर बघायला मिळतीलच, शिवाय देशोदेशीची सोन्याची आणि चक्क प्लॅस्टिकचीही चलने या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. १४ तारखेपर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहणार आहे. दिवाळीची सजावट म्हणजे सुप्त कल्पनाशक्तीला चालनासुद्धा. त्यात स्वत: बनविलेला आकाशकंदिल आणि पणत्या घरात लावण्याची मजा काही औरच! ‘मॉडर्न गर्ल्स हाय स्कूल’च्या विद्यार्थिनींनी थर्माकोलचे शंखाकृती आकाशकंदिल, ‘पेपर क्विलिंग’ ची भेटकार्डे बनविण्याचा आणि पणत्या रंगवण्याचा आनंद लुटला. या मोठय़ा सणाच्या निमित्ताने अनेक मित्रमंडळांनी सार्वजनिक ठिकाणी किल्ल्यांचे देखावे उभे केले आहेत. नारायण पेठेतील भारत मित्र मंडळाने किल्ले प्रतापगडाची २५ फूट लांब आणि सहा फूट उंच प्रतिकृती साकारली आहे.
दिवाळी म्हणजे शब्दरूपी फराळाचीही मेजवानी! वसुंधरा प्रकाशनातर्फे ‘पर्ण’ दिवाळी अंकाचे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पुणे प्रतिष्ठानच्या ‘आनंदी जीवन’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. विकास आमटे आणि भारती आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘संवेदना’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते तर  ‘दीर्घायु’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन आमदार गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रात:काळचे श्रवणीय कार्यक्रम हेही दिवाळीचे खास आकर्षण. पुण्याच्या मध्यवस्तीत श्रोत्यांची दाद मिळविणारे शास्त्रीय आणि सुगम संगीताचे कार्यक्रम आता उपनगरं व आसपासच्या भागांतही रंगू लागले आहेत. भोसरीतील ‘मृदुंगमणी स्व. बाबूराव फाकटकर ट्रस्ट’ आणि ‘गुरू विहार मित्र मंडळा’तर्फे गायिका मंजिरी आलेगांवकर यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल झाली. तर ‘पुणे शहर शिक्षण खाते राज्य कर्मचारी संघटने’तर्फे पुणे विद्यापीठात गायिका हेमा उपासनी यांच्या ‘मितवा’ या हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.