पिण्याचे पाणी पुरविणा-या तलावातून शेतीसाठी होणारा पाण्याचा वापर थांबविण्याच्या सूचना आमदार विजय औटी यांनी सोमवारी टंचाई आढावा बैठकीत दिल्या.
तालुक्यात यंदा समाधानकारक पाउस झाला असला तरी उन्हाळय़ात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये याची आतापासूनच काळजी घेणे गरजेचे आहे असे औटी यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांतील मोटारी बंद करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आहे ते पाणीशेतीसाठी वापरून उन्हाळय़ात टँकरची मागणी करणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काही महिन्यांत लोकसभेची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर टंचाईसंदर्भात प्रशासनास सूचना करणे अवघड होईल, त्यामुळे पदाधिका-यांनी संभाव्य टंचाईचे प्रस्ताव आताच सादर करणे गरजेचे आहे असे औटी म्हणाले.
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत वडगाव आमली व भांडगाव येथे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता या बैठकीत व्यक्त करण्यात आली तर जानेवारी ते मार्च दरम्यान आणखी ४८ गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची आवश्यकता भासेल अशाप्रकारचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. एप्रिल ते जूनदरम्यान आणखी दहा ते बारा गावांची त्यात भर पडू शकेल असे गटविकास अधिकारी किरण महाजन यांनी सांगितले.
सभापती सुदाम पवार, उपसभापती अरुणा बेलकर, गंगाराम बेलकर, जिल्हा परिषदेचे सदस्य विश्वनाथ कोरडे, प्रदीप वाळुंज, पारनेरचे सरपंच अण्णासाहेब औटी, उपसरपंच नंदकुमार देशमुख, गटविकास अधिकारी किरण महाजन, तहसीलदार जयसिंग वळवी, विविध गावांचे मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक या वेळी उपस्थित होते.