डोंबिवलीत कुंभारखाणपाडा येथे सोमवारी संध्याकाळी झालेल्या एका तरुणाच्या खुनातील दोन आरोपी विष्णुनगर पोलिसांनी रात्री दत्तनगरमधून अटक केले. कांदा-बटाटे विक्रीच्या दुकानात ते लपून बसले होते. फरार दोन आरोपींचा शोध सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
गौरव कदम या तरुणाचा सोमवारी संध्याकाळी कुंभारखाणपाडा येथील उमिया संकुलाजवळ निर्घृण खून करण्यात आला होता. पोलिसांनी हालचाली करून दत्तनगरमध्ये एका कांदा बटाटा दुकानात लपून बसलेल्या श्रीकांत साळुंखे (वय २३), करण दळवी यांना अटक केली. त्यांचे दोन साथीदार फरार आहेत.
गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या धनराज महाजन ऊर्फ पिल्ले यांच्या खून प्रकरणातील गौरव आरोपी आहे. तो जामिनीवर बाहेर आला होता. तो मित्राच्या घरी राहत होता. गौरव काल संध्याकाळी कुंभारखाण पाडय़ातील रागाई मंदिराजवळ चार आरोपींना दिसला. त्यांचे तेथे भांडण झाले.
आरोपींनी गौरवला जबरदस्तीने एका गाडीत बसून उमिया संकुलाजवळील मोकळ्या जागेत नेले. तेथे त्याच्यावर दगडाने प्रहार करून ठेचून ठार मारले, असे राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.



