नेत्रदानांविषयी आस्था, पण कार्यवाहीत अनास्था

अंधकारमय जीवनात प्रकाश आणण्यासाठी ‘तमसो मा ज्योतिर्गमय’चा संदेश देत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड कार्यरत आहेत. जागरूकतेचा अभाव आणि अंधश्रध्देच्या कचाटय़ात सापडलेल्या नागरिकांना ‘नेत्रदाना’चे महत्व अद्याप पटलेले नाही.

नाशिकमध्ये नेत्रदानाची संख्या लाखाच्या घरात पोहोचली
अंधकारमय जीवनात प्रकाश आणण्यासाठी ‘तमसो मा ज्योतिर्गमय’चा संदेश देत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड कार्यरत आहेत. जागरूकतेचा अभाव आणि अंधश्रध्देच्या कचाटय़ात सापडलेल्या नागरिकांना ‘नेत्रदाना’चे महत्व अद्याप पटलेले नाही. नेत्रदानाचे इच्छुकांनी केलेले संकल्पही केवळ कागदोपत्री राहत आहेत. दुसरीकडे, नेत्र स्वीकारणाऱ्यांकडून अनेकदा प्रतिसाद मिळत नसल्याने विशिष्ट कालावधीनंतर उपलब्ध असलेले पारपटल (कॉर्निया) फेकून देण्याची विचित्र स्थिती निर्माण होत असल्याचे लक्षात येते.
नेत्रदानाविषयी सुरू असलेल्या जन जागृतीमुळे नाशिकमध्ये नेत्रदानाचा संकल्प करण्यांची संख्या लाखाच्या घरात पोहोचली आहे. त्यात २० ते ३० वर्षे वयोगटातील अर्थात तरूणांचे प्रमाण लक्षणिय आहे. मात्र आकडय़ांच्या फुगवटय़ाचा प्रत्यक्षात फारसा लाभ होत नसल्याची धक्कादायक बाब नॅबच्या कामकाजात पुढे आली. पांढरी काठी दिन वा जागतिक अंधदिनाच्या निमित्ताने येणारे लेख, विविध जाहिराती, चर्चासत्रे, शिबिरांच्या माध्यमातून नेत्रदानाविषयी माहिती दिली जाते. यामुळे प्रेरीत होऊन नेत्रदान करण्याचे इच्छापत्र अनेक जण लिहून देतात. त्यात तरूणांचे प्रमाण जास्त असले तरी नेत्रदानाचे काम हे मृत्यू पश्चात केले जाते. कोणाला मृत्यू कधी, कुठे होईल याबाबत अनिश्चितता असते. आज इच्छापत्र लिहून देणाऱ्यांचा ५० ते ६० वर्षांनंतर मृत्यू होईल असे गृहित धरले तर सद्यस्थितीत या इच्छापत्राचा फारसा उपयोग होत नाही. काही वेळा मध्य वय किंवा ज्येष्ठ नागरीकांकडून नेत्रदानाविषयी इच्छापत्र भरले गेल्यास त्यांच्या मृत्यूपश्चात संबंधित नातेवाईकांकडून नेत्रपिढी किंवा शासकीय रुग्णालयास कळविले जात नाही.
अपघातात निधन झालेल्या व्यक्तींचे डोळे जर काढायचे म्हटले तर, नातेवाईक आता डोळे पण कमी पडलेत का, असा उपरोधीक प्रश्न उपस्थित करतात. यामुळे ‘डोळे असून आंधळे’ सारखी स्थिती निर्माण झाली आहे. अनेकदा नेत्रदाता आणि स्वीकारणारा यांच्यातील वयातील तफावत, लिंग, शारीरिक क्षमता, त्याची आर्थिक स्थिती यावर परिणाम करत असल्याचे नॅबच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षा निर्मला शहा यांनी सांगितले.
मणिशंकर आय हॉस्पिटल नेत्रपेढीच्या संचालिका डॉ. प्राची पवार यांनी नेत्रदानाविषयी आपल्याकडे सरकार दरबारी अनास्था असल्याचे नमूद केले. नेत्रदानाविषयी चर्चा होत असतांना ते सहज कोणी कसे करू शकते, या संदर्भातील प्रक्रिया काय आहे याबद्दल अनभिज्ञता आहे. तसेच, ‘बुबुळांचे अंधत्व’ असणाऱ्यांना नेत्र रोपणाचा फायदा होत असल्याचे अनेकांना माहीत नसते.
याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे.
धार्मिक अंधश्रध्देचा पगडा या कामात अडथळा आणतो. नेत्रदात्यांच्या डोळ्यांची गुणवत्ता नेत्ररोपण करताना तपासली जाते, त्या क्षमतेचा अंध रुग्ण, त्याची आर्थिक तसेच शारीरिक क्षमता यावर बरेच काही अवलंबून असते. १०० पैकी १० संकल्पकर्त्यांचे डोळे नेत्रपेढीत येतात. त्यातील दोन ते तीन लोकांच्या डोळ्यांचे प्रत्यारोपण होते हे वास्तव असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. यामुळे नजीकच्या काळात नागरीक तसेच अंधत्व असलेल्यांमध्ये जागृती घडवून आणण्याचे आव्हान सरकारी, निमसरकारी आणि स्वयंसेवी संस्थासमोर आहे.

नेत्रदानासाठी हे लक्षात घ्या
व्यक्तीच्या मृत्यूनंतर सहा तासाच्या आत डोळा काढल्यास नेत्रदान करता येते. मृत व्यक्तीचे डोळे काढेपर्यंत ते स्वच्छ पाण्याच्या ओल्या कपडय़ाने झाकून ठेवणेही आवश्यक असते. अन्यथा पारपटल कोरडे पडू शकते. मृत्यू पश्चात सहा तासाच्या आत डोळा काढल्यानंतर तो नेत्रपेढीत आणला जातो. तेथे ‘एमके मीडिया’ या रसायनाच्या बाटलीत तो वातानुकूलीत यंत्रणेत ठेवला जातो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर रुग्णाच्या नातेवाईकाने जवळच्या शासकीय रुग्णालयात अथवा नेत्रपेढीत तातडीने संपर्क साधणे
गरजेचे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Donation of eyes

ताज्या बातम्या