पोलिसांविषयीची अनाठायी भीती दूर ठेवा!

पोलीस अधीक्षक डॉ रश्मी करंदीकर यांचे मत समाजातील मोठय़ा वर्गात पोलीस विभागाविषयी गैरसमज आहेत. पोलिसांबद्दल अनाठायी भीती आजही मोठय़ा प्रमाणात समाजात आहे. अनेकांना आपल्या घराजवळचे पोलीस ठाणे कोणते आहे हेच माहीत नसते.

पोलीस अधीक्षक डॉ रश्मी करंदीकर यांचे मत
समाजातील मोठय़ा वर्गात पोलीस विभागाविषयी गैरसमज आहेत. पोलिसांबद्दल अनाठायी भीती आजही मोठय़ा प्रमाणात समाजात आहे. अनेकांना आपल्या घराजवळचे पोलीस ठाणे कोणते आहे हेच माहीत नसते. अनेक सुशिक्षित लोकांना सरकारी कार्यालयांची माहिती असली तरी पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ आली तर त्यांची घाबरगुंडी उडते. पोलिसांबद्दलची ही भीती दूर होण्याची गरज आहे, असे मत महामार्ग वाहतूक विभागाच्या पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर यांनी ठाण्यात व्यक्त केले.
प्रारंभ कला अ‍ॅकॅडमीच्या वतीने महिलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महिला महोत्सव २०१३’ अर्थात ‘आम्ही साऱ्याजणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, स्पर्धा या महोत्सवात पार पडल्या. तर सायंकाळी विविध क्षेत्रांतील यशस्वी महिलांच्या प्रकट मुलाखतींचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी डॉ. रश्मी करंदीकरांनी उपस्थितांशी संवाद साधला. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाजानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. पोलिसांच्या वतीने बसवण्यात आलेल्या मदत पेटीमध्ये आपले निनावी पत्र टाकून स्त्रिया आपली तक्रार योग्य पद्धतीने पोहचवू शकते. पोलिसांवर विश्वास ठेऊन त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. महिलांनी आत्मविश्वास वाढवून संघटितपणे अत्याचार रोखण्यास सरसावले पाहिजे, असे मार्गदर्शन करंदीकर यांनी केले.
महाराष्ट्रीय लोकांवर आजही चांगले संस्कार आहेत. आपल्याकडच्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये आजही महिलांना आदराचे स्थान आहे. प्रत्येकाने आपली आवड आहे त्याच क्षेत्रात करिअर करणे अधिक गरजेचे आहे. त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान अत्यंत महत्त्वाचे आहे. पोलिसांमध्ये महिला अधिकाऱ्यांना पुरुष अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही हादेखील गैरसमजच आहे. अधिकारी हा अधिकारी असतो त्यामध्ये महिला आणि पुरुष असा भेद कधीच नसतो. मात्र महिला तक्रारदार महिला अधिकाऱ्यांशी अधिक मनमोकळेपणाने आपली तक्रार मांडते हा महिला असण्याचा फायदा आहे. प्रारंभ कला अकादमीच्या डॉ. अरुंधती भालेराव यांनी करंदीकर यांच्याशी संवाद साधला. अभिनेत्री अश्विनी एकबोटे, सामाजिक कार्यकर्त्यां इंदवी तुळपुळे यांच्यासारख्या मान्यवरांचे विचार देखील कार्यक्रमातून उलगडण्यात आले.    

महिलांनी स्वयंसिद्ध रहावे!

महिलांनी नेहमीच सिद्ध असणे गरजेचे आहे. आत्मरक्षणाचे प्रशिक्षण प्रत्येक महिलेने घेतले पाहिजे. शिवाय रेल्वे पोलिसांचे क्रमांक, हेल्पलाइन नंबर, कंट्रोलरूम क्रमांक, पोलिसांचे संपर्क नंबर असे सर्व नंबर महिलांनी जवळ ठेवले पाहिजेत. तसेच एखाद्या अनुचित प्रकाराकडे डोळेझाकदेखील महिलांनी करू नये.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Donts get fear from police dr rashmi karandikar

ताज्या बातम्या