ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ. प्रकाश आमटे द रियल हिरो’ या चित्रपटाला देशात आणि देशाबाहेर मिळालेला प्रतिसाद बघता आता भारत-पाकिस्तानचे असलेले संबंध पाहता तेथेही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांशी उद्या, शुक्रवारी संवाद साधणार आहे. शिवाय, मुंबईच्या दहशतवादी हल्ला प्रकरणात फाशीची शिक्षा जाहीर झालेल्या याकूब मेमनला हा चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचे चित्रपटाच्या दिग्दर्शिका अ‍ॅड. समृद्धी पोरे यांनी सांगितले. सत्कार समारंभाच्या निमित्ताने नागपुरात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
या चित्रपटाची निर्मिती करण्यापूर्वी अनेक लोकांनी मला हा चित्रपट कोणी बघायला येणार नाही. उगाच खर्च करू नको, असे सल्ले दिले होते. मात्र, आज चित्रपटाला प्रचंड यश मिळाले आहे. विशेषत तरुण वर्गाने मोठय़ा प्रमाणात या चित्रपटाला चांगली पसंती दिली आहे. एखाद्या समाजसेवकाच्या जीवनावर असलेल्या सामाजिक आशयाच्या चित्रपटाला मिळालेले यश ही मराठी चित्रपटासाठी मोठी उपलब्धी आहे. चित्रपटातून पैसा मिळाला असला तरी त्याच्या पलिकडे या चित्रपटाने वेगळा आनंद दिला, पण अनेक युवकांना हा चित्रपट प्रेरणादायी ठरल्याचे अनुभव आले. कुष्ठरोग्यांसाठी काम करण्यासाठी अनेकांनी चित्रपट बघून इच्छा व्यक्त केली आहे. अमेरिका, स्वीत्झलॅंड, हॉंगकाँग, दुबई या देशात चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. दुबईत असलेल्या काही चित्रपट रसिक कराचीत हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यांचे बोलणे झाले आहे. या चित्रपटासाठी गेल्या पाच-सहा वषार्ंपासून काम करीत असताना मी केवळ वात लावली. आता त्याला मशालीचे स्वरूप प्राप्त झाले आहे आणि ही मशाल घेऊन जाण्याची जबाबदारी मराठी रसिकांची आहे. महाराष्ट्राबाहेर हा चित्रपट बघायला मिळावा म्हणून हिंदी भाषेत हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. विदर्भातील अनेक कलावंतांनी अतिशय चांगली कामे केली आहेत. आदिवासीच्या भूमिकेला विदर्भातील कलावंतांनी योग्य न्याय दिला. तो वाखाणण्याजोगा आहे.
मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांना हा चित्रपट दाखविण्यात आला असून उद्या, शुक्रवारी डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे यांच्यासह चित्रपटातील काही कलावंत संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे, कारागृहात असलेल्या याकूब मेमनलाही हा चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचे पोरे म्हणाल्या.

उद्या कलावंतांचा सत्कार
गुलमोहोर बहुउद्देशीय संस्था आणि आखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २४ जानेवारीला डॉ. प्रकाश आमटे द रियल हिरो या चित्रपटाच्या निर्माती आणि दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांची प्रगट मुलाखत आणि त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवाय, याच कार्यक्रमात डॉ. प्रकाश आमटे यांच्या सहवासात सुखदुखाचे मोलाचे क्षण अनुभवलेल्या अशा महानुभवांचा आणि या चित्रपटात भूमिका केल्या वैदर्भीय कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार अनिल सोले, डॉ. रवी वानखेडे उपस्थित राहणार आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात सायंकाळी ४.३० वाजता हा कार्यक्रम होईल.