स्वामी विवेकानंद सार्धशतीनिमित्त उद्या, ११ ते १३ जानेवारीदरम्यान डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ओजस्वी वाणीतून साकारलेल्या ‘नरेंद्र ते विवेकानंद’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असल्याची माहिती श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी ७ ते ९ वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आयोजित या व्याख्यानमालेचे उद्घाटन उद्या सायंकाळी ७ वाजता डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विजय वाघमारे राहणार आहेत. १२ जानेवारीला स्वामीजींच्या जयंती दिनाचे औचित्य साधून भारतीय सद्विचार प्रसारक मंडळ, चंद्रपूर या संस्थेला आमदार मुनगंटीवार यांच्यातर्फे फिरते वाचनालय भेट देण्यात येणार आहे. व्याख्यानमालेच्या या दुसऱ्या दिवशीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. रवींद्र भागवत राहतील.
व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी अर्थात, समारोपीय दिनी सुप्रसिद्ध कथालेखक मोहन देशपांडे यांच्या ‘ही वाट चिरंतनाची’ या पुस्तकाचे प्रकाशन  सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ गोंडवान शाखेचे अध्यक्ष डॉ. शरदचंद्र सालफळे राहतील.
स्वामी विवेकानंद सार्धशतीनिमित्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वर्षभर जिल्ह्य़ात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा आमदार मुनगंटीवार यांचा मानस आहे.
यानिमित्ताने निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, समूह गीत स्पर्धा, मॅराथॉन स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, बोधवाक्य व घोषवाक्य स्पर्धा आदी स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन वर्षभर करण्यात येणार आहे.
तेजस्वी विचारांनी ओतप्रोत हिंदू धर्मप्रसारक स्वामी विवेकानंदांच्या सार्धशतीनिमित्त या व्याख्यानमालेला तीनही दिवस जिल्ह्य़ातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार आणि संस्थेच्या वतीने सदस्यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. पत्रकार परिषदेला राजेंद्र गांधी, किशोर जोरगेवार, सुभाष कासनगोट्टवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.