सालेकसा तालुक्यातील कावराबांध या अतिसंवेदनशील भागातील आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या १४ वर्षांपासून उत्कृष्ट सेवा प्रदान केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनोहर जुमडे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. विवेक अनंतवार यांना डॉ. आनंदीबाई जोशी राज्यस्तरीय वैयक्तिक प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा मुंबई येथे गौरव करण्यात आला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला महाराष्ट्र शासनातर्फे गोंदियाच्या माहिती व जनसंपर्क  महासंचालनालय जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने २६ जानेवारी २०१३ ला महाराष्ट्रात प्रथमच लोकराज्य प्राथमिक आरोग्य केंद्र घोषित करण्यात आले, याची दखल घेऊन नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेतर्फे नुकतेच  महाराष्ट्र राज्य निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनोहर जुमडे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. छत्रपाल बांडबुचे, सचिव डॉ. अशोक सागोते, कोषाध्यक्ष डॉ. नितीन खानोरकर, डॉ. नाना पोचगे, डॉ. पुरोहित, डॉ. श्रीकांत वणीकर, डॉ. हरीश राजगिरे, डॉ. सुनील अतकर, डॉ. रवि उदापुरे, डॉ. राजू कोसे, निमा शाखा हिंगणाचे अध्यक्ष डॉ. पावसेकर, डॉ. मनीषा राजगिरे, डॉ. प्रीती मानमोडे, डॉ. रवींद्र बोथरा, डॉ. अविनाश फुडे, डॉ. खंडेलवाल, डॉ. याकूब, डॉ. मंगेश भलमे, डॉ. राजेश गुरू, डॉ. गुडलवार, डॉ. शैला कोसे, डॉ. रत्नाकर धामणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. गिरी यांनी केले.