मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी दौरा

भीषण दुष्काळ मराठवाडय़ाने अनुभवला. पिके गेली. पिण्याच्या पाण्यासाठी त्राही-त्राही झाले. तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची टाकी आणि टँकरने पाणी या सुविधा दिल्यानंतर प्रशासनाने पाठ थोपटून घ्यायला सुरुवात केली.

भीषण दुष्काळ मराठवाडय़ाने अनुभवला. पिके गेली. पिण्याच्या पाण्यासाठी त्राही-त्राही झाले. तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची टाकी आणि टँकरने पाणी या सुविधा दिल्यानंतर प्रशासनाने पाठ थोपटून घ्यायला सुरुवात केली. मान्सून केवळ १५ दिवसांवर येऊन ठेपला असताना औरंगाबाद जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्तांच्या भेटीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची माहिती दर आठवडय़ाला कोणीतरी आवर्जून सांगायचे. मात्र, दौरा नक्की होत नव्हता. उद्या (शुक्रवारी) संध्याकाळी ते औरंगाबाद मुक्कामी येतील नि शनिवारी (दि. २५) जिल्ह्य़ात विविध योजनांची ते पाहणी करतील.
जायकवाडीत गेल्या वर्षी अर्धा टक्के पाणीसाठा होता, तेव्हा समन्यायी पाणीवाटपाची चर्चा सुरू झाली. दरम्यान, नगर व नाशिक जिल्ह्य़ांचे पोटभर पाणी पिऊन झाले होते. वरच्या धरणांमधून पाणी सोडा, असा टाहो फोडल्यानंतरही सरकारकडून वेगाने हालचाली काही होत नव्हत्या. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत नगर व नाशिकच्या मंत्र्यांना ‘खलनायक’ ठरवायला सुरुवात केली, तेव्हा पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तहान भागली, पण अजूनही समन्यायी पाणीवाटपाचे धोरण ठरलेले नाही.
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामार्फत ठरविलेले नियम व कायदा यात विसंगती असल्याने पाऊस अधिक पडला, तरी जायकवाडी भरेल काय, या प्रश्नाचे उत्तर कोणीच देत नाही. धोरणात्मक पातळीवर बदल करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री चव्हाण शनिवारी औरंगाबाद जिल्ह्य़ात फिरतील तेव्हा त्यांनी या प्रश्नांवर काय तोडगा काढला, या प्रश्नाचे उत्तर देणार काय, याची उत्सुकता आहे. मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी फळबागांना मदत देण्याविषयीचे धोरण ठरले नसल्याचे नुकतेच जाहीर सांगितल्याने त्या विषयीही मुख्यमंत्री काय बोलतील, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
उस्मानाबाद व जालना शहरांतील पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. या दोन्ही शहरांत अजूनही सर्वसामान्य माणसाला रोज पाणी मिळत नाही. अंतर्गत जलवाहिनीचे प्रश्न किचकट बनल्याने गेल्या १५ दिवसांपासून उस्मानाबादला पाणीपुरवठा झाला नाही. जालन्यातही पाणीपुरवठा विस्कळीतच आहे. योजना पूर्ण झाली की काम झाले, असे अहवाल प्रशासन देत असल्याने पाणी देण्यात यशस्वी ठरलो आहोत, असा समज निर्माण होऊ शकतो, असे विरोधी पक्षाचे नेते आवर्जून सांगतात.
दुष्काळग्रस्त भागात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दौरे केले. तथापि, राज्य मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी मराठवाडय़ाकडे फारसे लक्ष दिले नसल्याची भावना सर्वसामान्य जनतेत आहे. या हंगामात बियाणे, खतांच्या अनुषंगाने काही सवलती मिळतील काय, अशीही विचारणा केली जाते.
या अनुषंगाने बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी नेहमीच जिल्ह्य़ावर अन्याय केला. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही जायकवाडीत पाणी पोहोचू दिले गेले नाही. जळालेल्या फळबागांचे पंचनामे झाले. मात्र, मदत मिळाली नाही. कर्जाची गरज आहे, मात्र ते उपलब्ध केले नाही. अनेक तक्रारी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून त्या सुटणार नाहीत, याची खात्री आहे. त्यामुळे हा दौरा केवळ औपचारिक असल्याची टीका दानवे यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Drought tour of cm in aurangabad

ताज्या बातम्या