अन्न व औषध प्रशासनाकडून जनतेच्या तसेच शासनाच्या डोळय़ांत धूळफेक केली जात आहे. जिल्हय़ातीला सर्व औषध विक्रेते सोमवार दि. १६, १७ आणि १८ डिसेंबर रोजी आपली दुकाने बंद ठेवतील जर बंदमध्ये सहभागी झालेल्या एकाही औषध विक्रेत्यावर प्रशासनाने कारवाई केली तर संपूर्ण जिल्हय़ात बेमुदत बंद पुकारला जाईल, असा इशारा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अरुण पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला. औषध विक्रेते प्रशासनाच्या कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नाहीत असेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.
प्रिस्क्रिप्शनची सक्ती नाही असे जाहीर करणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कॉम्बीफ्लॉम या अंगदुखीच्या २० गोळय़ांचा तपशील न मिळालेल्या दुकानास निलंबन का दिले?, डोकेदुखी, अंगदुखीसारख्या किरकोळ आजारांसाठी आजपर्यंत सर्वसामान्य रुग्ण प्रिस्क्रिप्शन शिवायच औषधांची खरेदी करीत आहेत व अशा औषधांचे बिल ग्राहकदेखील मागत नाहीत. अशा औषधांच्या खरेदी-विक्रीचा तपशील प्रशासनाकडून मागितला जातो आणि तो न मिळाल्यास निलंबन केले जाते. ज्या औषधांचे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असते अशा औषधांची बिले विक्रेता करीत असतो. जनतेच्या आरोग्यहिताचा आव आणून प्रशासन ठराविक हेतूने औषध विक्रेत्यांना बदनाम करीत असल्याचा आरोप पवार यांनी या वेळी केला.
पवार म्हणाले, औषधी दुकानात फार्मासिस्ट हजर असतानाही किरकोळ कारणांसाठी हजारो दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस अथवा निलंबनाला तोंड द्यावे लागत आहे. अधिकारी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून काही दुकाने कायमस्वरूपी बंद करण्याचे असंवेदनशील कृत्य करीत आहेत.
अनिल नावंदर म्हणाले, बंदमध्ये सहभागी होणाऱ्या औषण्ध विक्रेत्यांवर कारवाया करण्याच्या धमक्यांना सभासद भीक घालणार नाहीत. जिल्हय़ातील १०० टक्के औषधी दुकाने बंद राहून प्रशासनाच्या दुटप्पी धोरणांचा निषेध नोंदवतील. प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांवर नाहक दडपशाहीचे धोरण अवलंबल्यास कोणत्याही क्षणी बेमुदत बंदचे आंदोलन पुकारले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
आपत्कालीन सेवेची व्यवस्था प्रशासनाने केल्यामुळे आता बंद काळात आम्हाला आपतकालीन व्यवस्था करण्याची गरज नाही. प्रशासनाने एकदा औषध विक्री सेवा देऊन पाहावी मग वस्तुस्थिती समोर येईल व प्रशासनाला औषधी विक्रेत्यांचे दु:ख कळेल. प्रशासनाकडे सर्व आपत्कालीन व्यवस्थेच्या सोयी उपलब्ध असताना बंदमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सभासदांना धमक्या देण्याचे कारण काय हे कळत नाही. प्रशासन आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करीत आहे, दबाव टाकत आहे, प्रशासकीय अधिकाराचा दुरुपयोग करीत आहे. प्रत्येक भागात सभा घेऊन जबदरदस्तीने काहीही लिहून घेत आहे हे बरोबर नाही. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करून दुकान बंद ठेवणार आहोत. प्रशासनाने अनावश्यक दबावतंत्र वापरू नये अन्यथा केमिस्टांचा संयम सुटल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही जिल्हाध्यक्ष अरुण पवार व सचिव प्रवीण पाटील यांनी या वेळी दिला.

‘शरद पवारांची साथ सोडत सत्तेत जायचा निर्णय का घेतला?’ अजित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले..