शिवसंस्कृती ढोल पथकात सुशिक्षितांची मांदियाळी

ढोलवर पडणारी टिपरूची थाप.. ताशाचा गजर.. टोलचा नाद.. आद्यगिरीचा झंकार.. या आवाजात डौलाने फिरणारा भगवा ध्वज.. एरवी मुंबई -पुण्याच्या गणेश मिरवणुकीत दिसणारे हे चित्र अनेकांना पाय थिरकायला भाग पाडते.

ढोलवर पडणारी टिपरूची थाप.. ताशाचा गजर.. टोलचा नाद.. आद्यगिरीचा झंकार.. या आवाजात डौलाने फिरणारा भगवा ध्वज.. एरवी मुंबई -पुण्याच्या गणेश मिरवणुकीत दिसणारे हे चित्र अनेकांना पाय थिरकायला भाग पाडते. हा धागा पकडत नाशिकचे सांस्कृतिक वेगळेपण जपण्यासाठी काही तरुण मित्र मंडळी एकत्र आली आणि अनोखे शिवसंस्कृती ढोल पथक आकारास आले. आगामी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, पथकाची रंगीत तालीम सुरू झाली असून त्याचे वैशिष्टय़े म्हणजे अबाल वृद्धांपासून महिला वर्ग, इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुशिक्षित बाप्पा प्रेमींचा मिळालेला प्रतिसाद.
नाशिकचा सांस्कृतिक चेहरा मोहरा हा साऱ्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. गणेश विसर्जना वेळी सहभागी होणारे जिवंत देखावे, लेझीम पथक, दांडपटय़ाची थरारक प्रात्यक्षिके, डीजेचा दणदणाट यामुळे मिरवणूक लक्षात राहते. मात्र, मिरवणुकीत धुंदीत बेहोश होत थिरकणारी तरुणाई साऱ्यांना अस्वस्थ करते. मिरवणूक अविस्मरणीय व्हावी, पाहणाऱ्यांच्या सुखद आठवणीचा ती भाग बनावी, त्यात काही तरी आधुनिकता आणावी, मात्र मिरवणुकीच्या मूळ उद्देशात फरक पडू नये या उद्देशाने काही सुशिक्षित तरुण मंडळी एकत्र आली आणि त्यांच्या पुढाकाराने शिवसंस्कृती ढोल पथक आकारास आले. त्यात आयटी क्षेत्रात काम करणारे अरुण मुंगसे, अभिजीत पवार, सुशांत धारणकर, महेश गोसावी, स्वप्निल कासार यांचा समावेश आहे. सालाबादाप्रमाणे निघणाऱ्या गणेशोत्सव मिरवणुकांचा बाज बदलण्यासाठी त्यांनी १५ ऑगस्ट २०१२ रोजी शिवसंस्कृती ढोल ताशा पथकाची स्थापना केली. त्या वेळी संगीत क्षेत्राशी असणारा त्यांचा संबंध म्हणजे टेबलाचा तबला वाजविणे अथवा कुठल्याही मिरवणुकीत नाचणे इतकाच होता. मात्र गायनाची आवड असणाऱ्या स्वप्नीलने ढोल-ताशासाठी स्वतंत्र धून तयार केली. मित्रांनी पैसे जमवत खास मोठय़ा आकाराचे ढोल, ताशा, टोल, ध्वज, शंख, आद्यगिरी आदी वाद्यांची जुळवाजुळव केली. पाच आवर्तनावर आधारित नंतर अनेक चाली तयार झाल्या. जे कानाला सुश्राव्य असेल, याचा जास्त विचार होऊ लागला.
महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, या पथकाचा सराव सुरू झाला आहे. यासाठी पथकातील सर्व सदस्य दर रविवारी औरंगाबाद नाक्यावरील गोदावरी लॉन्स येथे एकत्र जमून तीन ते चार तास सराव करतात. मागील वर्षी हे पथक नाशिकच्या मानाच्या म्हणजे रविवार कारंजावरील श्री सिद्धिविनायक गणेशाच्या मिरवणुकीत सहभागी झाले. लयबद्ध व शिस्तबद्ध म्हणून महापालिकेने ढोल पथकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले. अवघ्या सहा सदस्यांवर सुरू झालेल्या पथकाने मौखिक प्रसिद्धीच्या जोरावर ५० हून अधिक बाप्पा प्रेमींना आकर्षित केले आहे. त्यात इयत्ता पहिलीत शिक्षण घेणाऱ्या चिमुकलीपासून ते पदवीधर, अभियंता, व्यवस्थापन शास्त्र, वैद्यकीय, वास्तुविशारद आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा समावेश आहे. तसा महिला वर्गही ‘हम भी किसीसे कम नही’ म्हणत सहभाग नोंदवत आहे.
पथकातील देवयानी लेले या व्यावसायिक आहेत. आपल्याकडे महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. मग मिरवणुकीतील ढोल-ताशा पथकात तरी का मागे राहावे, या विचाराने आपण पथकात सहभागी झाल्याचे सांगत लेले यांनी हा अनुभव विलक्षण असल्याचे नमूद केले. वास्तुविशारदचे शिक्षण घेणारी कोमल सानप यंदा प्रथमच पथकात सहभागी झाली आहे. आजवर गणेश मिरवणुकीचा आणि माझा पाहण्यापुरता संबंध होता. तेव्हापासून ढोल-ताशांचे आकर्षण होते. सरावाने आता मी स्वत: ढोल-ताशा वाजवू शकते हा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याचे कोमलने सांगितले. बीपीओ कंपनीत सहव्यवस्थापक म्हणून काम करणारी राजश्री कुकडे जशी पथकाचा भाग आहे तसेच इयत्ता पहिलीच शिक्षण घेणारी अनघा बागूलदेखील.
महिला वर्गासह अनेक व्यावसायिक, अभियंते, डॉक्टर  यांच्यासह अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी अशा जवळपास ५० ते ५५ जणांचा पथकात समावेश आहे. यंदा मंडळाने वर्षभर सराव केला असून पथकात ध्वज पथक तसेच ढोल ताशा पथकात काही सुधारणा करण्याचे नियोजन केले आहे. सध्या सर्व सदस्य सरावात दंग आहेत. पथकाला मिळणारे मानधन हे पथकाच्या विकासासाठी वापरण्यासाठी मंडळाचे सदस्य प्रयत्नशील आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Drum rehearsal begins ahead of ganesh festival

ताज्या बातम्या