ओले आटले, सुके शेफारले

साधारणत: नेहमीच तेजीत असणाऱ्या मासळी व्यवसायावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. ताज्या मासळीचे प्रमाण घटल्याने ही परिस्थिती ओढवली असून त्यामुळे सुक्या मासळीच्या दरातही प्रचंड वाढ झाली आहे

साधारणत: नेहमीच तेजीत असणाऱ्या मासळी व्यवसायावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. ताज्या मासळीचे प्रमाण घटल्याने ही परिस्थिती ओढवली असून त्यामुळे सुक्या मासळीच्या दरातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे ताज्या मासळीची तहान सुक्या मासळीवर भागविणाऱ्या सर्वसामान्य खवय्यांच्याही तोंडचे पाणी वाढलेल्या दरांनी पळविले आहे. अगदी साध्या सुकट, बोंबिलांनीही शेकडो रुपये किलोची पातळी गाठली आहे. सुक्या कोळंबीचे सोडे तर आता लक्षाधीशांचीच मक्तेदारी बनू पाहात आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर मासेमारी हा मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायावर लाखो कुटुंबांचे जीवन अवलंबून आहे. त्यात कोळी समाजाबरोबरच इतर समाजांचाही समावेश आहे. एकीकडे केंद्र सरकारने केलेली डिझेलची दरवाढ, मच्छिमारांना मिळणाऱ्या विविध सुविधांवर आणलेली गदा, डिझेलचा परतावा मिळण्यास होणारा उशीर या समस्यांमुळे आधीच मच्छीमार मेटाकुटीला आले आहेत तर दुसरीकडे समुद्रातील मासळीचे प्रमाणही घटले आहे. पर्सनेिटची जाळी व त्यात परप्रांतीय मच्छिमारांसह परदेशी बोटींनाही सरकारने परवानगी दिल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे मासेमारी हा आतबट्टय़ाचा व्यवसाय ठरू लागला आहे. अनेकांनी तर मासेमारी करणे सोडून दिले आहे. त्यामुळे मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.
पुरवठाच कमी असल्याने मासळीच्या दरात वाढ झाली असून सुकी मासळीही त्यास अपवाद नाही. सुकी मासळी म्हणून प्रसिद्ध असलेली सुकट- ४०० रुपये किलो, बोंबील (५० रुपयांचे वीस नग ) वाकटय़ा- ४५० रुपये किलो, टेंगली- ५०० रुपये किलो, शिंगाडा -चारशे ते सहाशे रुपये किलो, माकोलो -चारशे ते सहाशे रुपये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळ्या प्रतीच्या मिळणाऱ्या कोळंबीचे- सोडय़ांचे दर सातशे रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. साधरणत: ज्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात मासे  मिळतात, तिथे पावसाळ्यात सुक्या मासळीला मागणी असते तर ज्या ठिकाणी मासे मिळत नाही तिथे वर्षभर सुक्या मासळीची मागणी असते. मात्र जादा मिळालेली मासळीच सुकविली जाते. सध्या माशांचे प्रमाणच घटल्याने सुक्या मासळीच्या दरात वाढ झालेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dry fish scarcity in market

ताज्या बातम्या