सोशल नेटवर्किंगमुळे फेसबुक आणि मोबाईलच्या माध्यमातून घरोघरी उमेदवारांचा होत असलेला जनसंपर्क आणि निवडणूक आयोगाने प्रचारासंदर्भात लावलेल्या अनेक निबर्ंधामुळे निवडणुकीच्या निमित्ताने पेंटर आणि फलक तयार करणाऱ्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. पूर्वी कुठल्याही निवडणुका असल्या की पेंटरच्या हाताला मोठय़ा प्रमाणात काम मिळत असे. आता मात्र संगणकामुळे ते कमी झाले आहे.
निवडणुकात कुठल्याही राजकीय पक्षांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या की उमेदवारांच्या नावाचे मोठे पोस्टर आणि फलक रंगविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पेंटरला कामे मिळत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत संगणकामुळे पाहिजे त्या आकारात आणि हवे तसे पोस्टर आणि होडिँग तयार केले जात असल्यामुळे पेंटरच्या हाताला काम मिळणे बंद  झाले आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराला प्रचाराच्या दृष्टीने आपपल्या भागात मोठे पोस्टर आणि बॅनर आवश्यक झाले आहे त्यामुळे त्याची मागणी मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आहे.
एरवी गणपती, दुर्गा उत्सवांमध्ये व्यस्त असलेल्या पेंटरांना वर्षभर फारसे काम नसायचे. त्यामुळे दर पाच वर्षांनी जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पेंटरच्या हातांना काम मिळत असे. त्यातून मोठय़ा प्रमाणात आर्थिक लाभ होत असे. गेल्या दहा वषार्ंत पोस्टर रंगविण्याचे काम कमी झाले आहे. निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांची प्रचार यंत्रणा कामाला लागली असून उमेदवारांनी प्रचार साहित्याची जमवाजमव सुरू केली आहे. पूर्वी उमेदवारांच्या नावाने लोकांचा घराच्या भिती रंगविल्या जात होत्या. मात्र, आता निवडणूक आयोगाने त्यावर र्निबध लावले आहेत. शिवाय घरमालकांच्या परवानगीशिवाय घराच्या भिंती रंगविणे म्हणजे गुन्हा आणि त्यामुळे संबंधित उमेदवाराला शिक्षा होत असल्यामुळे भिंती रंगविण्याचा प्रकार कमी झाला आहे. उमेदवारांच्या नावाने मोठय़ा प्रमाणात पोस्टर रंगविण्याचे काम पेंटरकडे मोठय़ा प्रमाणात असायचे.
अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते पेंटरकडे न जाता ऑफसेट प्रिटींगचे काम करणाऱ्यांकडून  पोस्टर तयार करून घेतात. निवडणुकीला सात दिवसांचा अवधी शिल्लक असून आजही चितारओळीतील किंवा महालातील अनेक पेंटरकडे कामे नाहीत. चितारओळ, जागनाथ बुधवारी, दसरा रोड, सीताबर्डी या भागात अनेक पेंटर पोस्टर रंगविण्याचे काम करतात. मात्र, निवडणुकीचे कामे मिळणे कठीण झाले आहे. साधारणत: एक मोठे पोस्टर तयार करण्यासाठी पाच ते दहा हजार रुपये खर्च येतो. मात्र संगणकामुळे ते काम दोन ते अडीच हजारात होत असल्यामुळे उमेदवार त्यांच्याकडून पोस्टर तयार करून घेतात. निवडणुकीत लागणारे झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स, बिल्ले, या वस्तू संगणकाच्या सहाय्याने तयार होत असल्यामुळे पेंटरकडे उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली आहे.