सायन-पनवेल महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सध्या धीम्या गतीने सुरू आहे. काम करताना आवश्यक असलेल्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. गेल्या पाच महिन्यांत महार्मावर झालेल्या ९० वाहन अपघातांमध्ये तब्बल २८ जणांना प्राण गमावावे लागले आहेत. तब्बल ३० जणांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. गेल्या वर्षांत ५४ जणांनी वाहन अपघातात प्राण गमावले आहेत. मंगळवारी सकाळी ६ वाजता खारघरजवळ महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये ठाण्यातील वागळे इस्टेटमधील दोन रहिवासी ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अजय आत्माराम सूर्यवंशी आणि जयवंत गंगाराम सरूयवशी अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही ठाण्यातील रहिवासी आहेत. तसेच तानाजी पवार, सविता गुरव आणि आकाश पवार हे तिघे जखमी झाले आहेत. खारघर येथील जे. डी. पोळ महाविद्यालयासमोर हा अपघात झाला आहे. पुढे असलेल्या टेम्पोवर कार आदळल्याने हा अपघात घडला आहे. अशी अपघांताची मालिका महामार्गावर सुरू आहे. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र महामार्गावर काम सुरू असताना आवश्यक असलेले दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स नसल्याने नवख्या वाहनचालकांची धांदल उडत आहे. त्याचप्रमाणे कामाचे साहित्य अनेकदा रस्त्यात असल्याने वाहन त्यावर धडकून अपघात होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. वाहतूक पोलीस विभागाकडून अनेकदा सूचना करून यात सुधारणा न झाल्याने अपघात वाढ होत असून रात्री आणि पहाटेच्या वेळी अपघात घडण्याचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी ते मे या कालावधीत अपघातांची आकडेवारी पाहिल्यास यातील गांभीर्य समोर येते. वाशी खाडी ते कंळबोली जंक्शन या २० किमी अंतरात सायन-पनवेल महामार्ग विस्तारला आहे. पाच महिन्यांच्या कालावधीत या महामार्गावर एकूण ९० वाहन अपघातांची नोंद आहे. यात २८ जणांनी त्याचे प्राण गमावले आहेत. ३० जणांना गंभीर दुखापत झाली असून १२ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या मार्गावर टोल नाका उभारण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. याचप्रमाणे सुरक्षेच्या उपायोजना इतक्याच तात्परतेने उभाराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.