अकलूजजवळील माळीनगर येथे सासवड माळी साखर कारखान्याचा ८० व्या वर्धापनदिन व सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या उदघाटनासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे अर्धा डझन मंत्री येत्या रविवारी, १० नोव्हेंबर रोजी येणार आहेत. सोलापूर जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी अंतर्गत उफाळलेल्या गटबाजीच्या पाश्र्वभूमीवर माळीनगरच्या या कार्यक्रमाकडे राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे.
शरद पवार व अजित पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, दिलीप सोपल आदी मंत्र्यांची या कार्यक्रमाच्या निमित्ताने माळीनगरला हजेरी लागणार आहे. याशिवाय काँग्रेसचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. रविवारी सकाळी १०.१५ वाजता आयोजिलेल्या या कार्यक्रमासाठी राज्यातील माळी समाजाची नेते मंडळीही उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीत अडगळीत पडलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या बालेकिल्ल्यात-अकलूजला खेटून माळीनगर आहे. तेथील गिरमे कुटुंबीयांचे मोहिते-पाटील यांच्याशी अनेक वर्षांपासून वितुष्ट आहे. तर गिरमे यांच्याबरोबर शरद पवार हे सलगी ठेवून आहेत. अलीकडे मोहिते-पाटील व पवार यांच्यातील दुरावा वाढल्याचे सांगितले जात असतानाच पवार हे माळीनगरला येत्या रविवारच्या कार्यक्रमास हजेरी लावणार असल्याने त्याबद्दल राजकीय क्षेत्रात उत्सुकता पसरली आहे.
गेल्या महिन्यात पुण्यात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या इंग्रजी अनुवादित चरित्र्यग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याकडे शरद पवार व अजित पवार यांनी पाठ फिरविली होती. त्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी उपस्थित राहून मोहिते-पाटील यांची मुक्त प्रशंसा करून राजकीय शेरेबाजीही केली होती. या पाश्र्वभूमीवर मोहिते-पाटील हे राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की काय, अशी शंकाही उपस्थित केली जात असताना आता मोहिते-पाटील यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या विरोधकाच्या कार्यक्रमास शरद पवार हे हजेरी लावणार असल्यामुळे राजकीयदृष्टय़ा हा चच्रेचा विषय ठरला आहे. तर या कार्यक्रमास विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील हे उपस्थित राहणार नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. आपल्याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कार्यक्रमास येणार असताना देखील त्याकडे मोहिते-पाटील यांनी पाठ फिरविल्यास त्याचाही वेगळा राजकीय अन्वयार्थ काढला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे अकलूज भागातील मोहिते-पाटील यांच्या राजकीय विरोधकांचीही नावे या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेत आवर्जून समाविष्ट करण्यात आली आहेत.