गृहमंत्री आर. आर. पाटील यांची खंत
कामाच्या गतीपेक्षा नियम महत्त्वाचे झाले आहेत. त्यामुळे कोणीही चौकट सोडून काम करण्यास तयार नसल्याने त्याचा कामकाजावर परिणाम होत आहे, अशी खंत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली.
येरवडा कारागृह येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. विरोधकांचा दबाव, माध्यमांचा आक्रमकपणा वाढत आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना नियम महत्त्वाचे झाले आहेत. त्यामुळे कोणीही चौकटीच्या बाहेर जाऊन काम करण्यास तयार नाहीत. नियम महत्त्वाचे झाल्याचा परिणाम कामकाजावर होत आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत दुष्काळावर चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यात पडलेल्या दुष्काळावर चर्चा झाली. जिल्हास्तरावर पक्षाच्या नेत्यांना आपल्या भागातील नागरिकांना सुविधा कशा देता येतील, याकडे लक्ष देण्याच्या सूचना पवार साहेबांनी केल्या आहेत. त्याच बरोबर पक्षापुढील आव्हाने, जमेच्या बाजू, पक्ष मजबुतीच्या बाबतीत चर्चा झाली.
राज्यातील २६ कारागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा सुरू
न्यायालयात खटल्यांची सुनावणी सुरू असलेल्या कैद्यांची संख्या कारागृहात मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयात घेऊन जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ लागते. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सीचा वापर करून हे मनुष्यबळ वाचविण्यासाठी राज्यातील २६ कारागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
पुण्यात सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात
जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सीसीटीव्ही बसविण्याची घोषणा केली होती. मात्र, ती अद्यापही अमलात न आल्याबद्दल पाटील यांना विचारले असता, पुण्यात सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. याबाबत पुण्यात सीसीटीव्ही बसले पाहिजेत अशी दादा आग्रही भूमिका आहे. हा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे असून त्यावर लवकरच निर्णय होईल. बॉम्बसूट बद्दल पाटील म्हणाले की, बॉम्बसूट खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाला. त्यामुळे त्याचा प्रस्ताव वाढतच गेला. बॉम्बसूटचा दर्जा तपासण्याची प्रयोगशाळा देशात फक्त एकच आहे. त्यामुळे त्याला विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे दंगली चौकशीसाठी जावेद अहमद यांची नियुक्ती
धुळे येथील दंगल अत्यंत छोटय़ा कारणावरून झाली. यामध्ये पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच नागरिकांचा मृत्यू झाला, ही दु:खद घटना आहे. या दंगलीची चौकशी करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपमहासंचालक जावेद अहमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल.
साहित्य संमेलन चांगल्या वातावरणात पार पाडावे
चिपळूण येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेबाबत विचारले असता, अशा कार्यक्रमांना नेहमीच चांगली सुरक्षा देण्यात येते. वादावर पडदा पाडावा आणि चांगल्या वातावरणात कार्यक्रम पडावा, अशी आमची अपेक्षा आहे.