नाटक, चित्रपट, दूरदर्शन, संगीत आदी क्षेत्रांतील जुन्या पिढीतील कलावंतांच्या गप्पा ‘भेटी लागे जीवा’ कार्यक्रमात रंगल्या आणि जुन्या आठवणींचा पट दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात पुन्हा उलगडला गेला. निमित्त होते रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. आठवणींबरोबर या कलाकारांवर चित्रीत झालेली गाणी या वेळी सादर करण्यात आली.
कार्यक्रमास नयनतारा, जीवनकला, लीला मेहता, दया डोंगरे, जयंत सावरकर, बाळ कर्वे, बाळ धुरी, सुनील शेंडे, किशोर प्रधान, शोभा प्रधान, अलका कुबल, सुरेश खरे, रवी पटवर्धन, राजा मयेकर, यशवंत देव, रामदास कामत, भाऊ मराठे, प्रदीप भिडे, ललिता केंकरे, पंढरीनाथ जुकर, आशालता, वंदना पंडित, लीलाधर कांबळी, अर्चना नेवरेकर, रवींद्र बेर्डे, मामा पेडणेकर आदी मंडळी उपस्थित होती.  ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना या वेळी उपस्थित होत्या. बकुळ पंडित यांनी ‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे नाटय़गीत सादर केले तर फैय्याज यांनी ‘लागी करेजवॉ कटय़ार’ हे नाटय़गीत गाऊन बहार आणली. पं. यशवंत देव यांनी काही विडंबन कविता सादर केल्या. जयंत पिंगुळकर, केतकी भावे, अर्चना गोरे, मंदार आपटे, दीपाली गचके आदींनीही काही गाणी सादर केली.
गिरगाव परिसरात पुस्तके विकणारे ८३ वर्षीय घैसास आजोबा, हल्ल्यात जखमी झालेल्या माणसाला मदत करणारी मिशेल कामले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उज्ज्वल शैक्षणिक यश मिळविणारी रिक्षाचालकाची कन्या सुवर्णा थोरात यांचा यावेळी खास सत्कार करण्यात आला. स्वत: मुळ्ये यांनी या कार्यक्रमासाठी आपली स्वत:ची २५ हजार रुपयांची देणगी दिली होती.