ज्येष्ठ नागरिकांनी वयाची चिंता करत बसण्याऐवजी स्वतचे मन सामाजिक कामांमध्ये जास्तीत जास्त गुंतवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे त्यांची मनशांती टिकून राहील, असे मत जेष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी ठाण्यातील ज्येष्ठ  नागरिक महोत्सवामध्ये व्यक्त केली.
व्यास क्रिएशनच्या वतीने १३ व्या  ज्येष्ठ नागरिक महोत्सवाचे आयोजन गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आले होते.  प्रमुख पाहुणे म्हणून रत्नाकर मतकरी आले होते.  महोत्सवाचे उद्घाटन योगतज्ज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नागरिकांनी आपण तरूणच आहोत असे समजून कार्यरत राहाण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे मनशांतीसोबत आरोग्य देखील उत्तम राहू शकेल,असा सल्ला मतकरी यांनी दिला. पूर्वी वानप्रस्थाश्रमाची कल्पना उत्तम होती. नोकरीत असताना जे करायला मिळाले नाही ते निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक करू शकत होते. ज्येष्ठांनी आपले प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवावे, असे आवाहन त्यांनी केले. दादाजी वैशंपायन यांनी यावेळी ज्येष्ठांशी संवाद साधला. तरूणांनी ज्येष्ठांचे अनुभव अवगत करून घेऊन त्याची प्रचिती वडीलधाऱ्या मंडळीना करुन दिल्यास त्यांना कृतकृत्य वाटेल, असे वैशंपायन म्हणाले. या कार्यक्रमात दादाजी वैशंपायन यांचा व्यासरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर शहरातील १० ज्येष्ठांना सेवारत्न तर १० ज्येष्ठांना ज्येष्ठरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. सतीश पुराणिक यांनी संधीवात, गुडघेदुखी या विषयावर व्याख्यान दिले. वैद्य सुचित्रा कुलकर्णी संपादित ‘ज्येष्ठ आरोग्यम्’ या अंकाचे तसेच श्रीराम बोरकर लिखित ‘चित्रपटकलेचा जागतिक इतिहास’ आणि ‘मुठीतले आभाळ’ या पुस्तकांचे रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ..
सेवा रत्न – पुरुषोत्तम वाडेकर, डॉ. सुनंदा देसाई, चंद्रसेन भुजबळ, विद्या म्हैसाळकर, विद्याधर निमकर, प्रतिभा कुलकर्णी, किसन बले, अनंत गलगली, भालचंद्र प्रधान, जवाहर भट. ज्येष्ठ रत्न – पुष्पा नाईक, विश्वास सकपाळ, शालिनी चौधरी, श्रीकांत कढे, विजय नागराज, शंकर आपटे, मधुकर लेले, मुकुंद विनोद, ज्योती केळकर.