पूर्वी काँग्रेसचा गड समजला जाणाऱ्या पूर्व नागपूर मतदारसंघावर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कब्जा केल्यानंतर हा गड कायम राहावा, यासाठी एकीकडे भाजप ताकदीनिशी मैदानात उतरली असतानाच दुसरीकडे हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. या मतदारसंघात २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत भाजप-काँग्रेसमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
आघाडी आणि महायुती संपुष्टात आल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा कृष्णा खोपडे यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसकडून अभिजित वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे दुनेश्वर पेठे, शिवसेनेचे अजय दलाल, तर बसपचे दिलीप रंगारी निवडणूक रिंगणात आहेत. सध्या सर्वच प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार प्रचार करीत असून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी निवडणूक रिंगणात असताना त्यांचा पराभव झाला होता. खोपडे यांना गेल्या निवडणुकीत ८८ हजार ८१४, तर चतुर्वेदी यांना ५३ हजार ५९८ मते पडली होती. शिवाय, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्व नागपुरात नितीन गडकरी यांना १ लाख १२ हजार ९६८, तर काँग्रेसचे मुत्तेमवार यांना केवळ ४७ हजार २२६ मते पडली. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत मताधिक्य मिळेल, अशी आशा आहे.
गेल्या पाच वर्षांत चतुर्वेदी यांनी पूर्व नागपुरात संघटनात्मक बांधणी केल्यामुळे त्याचा फायदा वंजारी यांना होत असला तरी त्यांच्या मागे कार्यकर्त्यांंची फारशी संख्या दिसत नाही. अभिजित वंजारी यांनी दक्षिण नागपुरातून उमेदवारी मागितली असताना त्यांना पूर्व नागपुरातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मतदारसंघ नवीन असला तरी दक्षिण नागपुरातील युवा कार्यकर्त्यांंचे संघटन त्यांच्या पाठीशी आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची एकमेव सभा वंजारी यांच्या प्रचारार्थ घेण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दुनेश्वर पेठे यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे, तर शिवसेनेचे उमेदवार अजय दलाल यांच्या प्रचारार्थ रेशिमबाग मैदानावर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा झाली असली तरी मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवारांचा जास्त प्रभाव दिसत नाही.
इतर मतदारसंघांच्या तुलनेत पूर्व नागपुरात बंडखोरांची संख्या कमी आहे. यामुळे खोपडे यांना सध्या तरी आव्हान नाही. या मतदारसंघातील सर्वाधिक सुमारे ८ नगरसेवक भाजपचेच आहेत. खोपडे हे शहर भाजपचे अध्यक्ष असल्याने संघटनेवरही त्यांची पकड आहे. खोपडे यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासाचा अजेंडा घेऊन मतदारांसमोर जात आहे, तर काँग्रेसने मात्र त्या विरोधात भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, बसप आणि शिवसेनेचे उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी येत्या पाच वर्षांत काय करणार हे जनतेसमोर मांडून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी सामना असला तरी या लढतीमध्ये पूर्व नागपूर भाजपच्या हाती कायम राहील की अन्य पक्षाच्या हाती जाईल, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.