महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व पुढील प्रक्रियेसाठी जाहीर करण्यात आलेली निवड समिती वादग्रस्त बनली आहे. निवड समितीमधील काही सदस्यांबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या समितीतील काही सदस्य पक्षात फारसे सक्रिय नसलेले आहेत, त्याचबरोबर पक्षाचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांचाही समितीत समावेश नसल्याकडे लक्ष वेधले जाते.
यासंदर्भात पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘कोणती निवड समिती जाहीर करण्यात आली, याची आपल्याला कल्पना नाही’ असे त्यांनी सांगितले. निवड समिती स्थापन करण्यासाठी आपण उद्या (शुक्रवारी) मुंबईत प्रदेशाध्यक्षांना भेटणार आहोत, असेही ते ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले. मात्र असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ठरल्याप्रमाणे शनिवारी (दि. १६) व रविवारी (दि. १७) होणार आहेत.
पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दहा जणांची निवड समिती जाहीर केली. त्यामध्ये पालकमंत्री मधुकर पिचड, काकडे, आ. अरुण जगताप, दादा कळमकर, शंकरराव घुले या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश स्वाभाविकपणे आहेच, मात्र करीमशेठ हुंडेकरी, अ‍ॅड. अशोक कोठारी, शिवाजी विधाते या नावांबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे तिघेही पक्षात फारसे सक्रिय नाहीत, असा आक्षेप घेतला जातो. शिवाय समितीमधून जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनाही डावलले आहे. पक्षाच्या शहर संघटनेचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले अंबादास गारुडकर यांचाही या समितीत समावेश नाही.
ही निवड समिती जाहीर झाल्यानंतर याबद्दल आता चर्चा होऊ लागली आहे. पक्षाचेच निरीक्षक काकडे यांनी या समितीबद्दल अनभिज्ञता व्यक्त केल्याने, कोणाच्या संमतीने ही समिती जाहीर करण्यात आली, याची कुजबुज पक्षात सुरू झाली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत पालकमंत्री पिचड व काकडे यांच्याकडे तक्रारीही केल्याचे समजले. त्यामध्ये महिला पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. समितीच्या स्थापनेसाठी आपण उद्याच प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार असल्याचे काकडे यांनीच सांगितल्याने जाहीर झालेल्या वादग्रस्त समितीत फेरबदल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.