ठाणे महापालिका क्षेत्रातील चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचार रॅली काढण्यात येत असल्याने प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. मात्र, उमेदवारांच्या या प्रचार रॅली आता ठाणेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागल्याचे दिसून येते. शहरातील वेगवेगळ्या भागात ऐन सांयकाळी उमेदवारांच्या प्रचार रॅली निघत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ लागला असून त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत ठाणेकरांना अडकून पडावे लागत असल्याचे चित्र पहावयास  मिळते.
ठाणे महापालिका क्षेत्रात कोपरी-पाचपखाडी, ठाणे शहर, कळवा-मुंब्रा आणि ओवळा-माजिवडा, असे चार विधानसभा मतदार संघ येत असून या मतदार संघामध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या पाच प्रमुख पक्षांसह इतर पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शर्यत लागल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून या चारही मतदार संघातील उमेदवारांनी प्रचार रॅली काढण्यावर अधिक भर दिला आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवर ऐन सायंकाळी उमेदवार प्रचार रॅली काढत आहेत. उमेदवाराचे प्रचार वाहन आणि त्यामागे कार्यकर्त्यांचे जथ्थे, असे रॅलीचे स्वरूप असते. विशेष म्हणजे, या रॅलीदरम्यान, उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत असतात. त्यामुळे या रॅलीचा वेग अतिशय संथ असतो आणि रॅलीमुळे वाहतूकीस अडथळाही निर्माण होतो. तसेच या रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीवरही त्याचा परिणाम होतो. परिणामी, रॅलीच्या भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते. त्यामुळे ऐन सायंकाळी कामावरून घरी परतत असलेल्या नागरिकांना या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते.
दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत होणारी वाढ आणि त्या तुलनेत अपुरे रस्ते यामुळे गेल्या काही वर्षांत ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. खरेतर निवडणूकीत हाच महत्वाचा मुद्दा असून तो सोडविण्याऐवजी उमेदवार रॅलीच्या माध्यमातून वाहतूक कोंडीत भर घालून या समस्येशी आपल्याला काही सोयरसुतक नसल्याचे दाखवून देत आहेत.