छोटय़ा सभा, व्यक्तिगत भेटी आणि मोटारसायकल रॅलींवर भर
 विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असल्याने प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला आहे. राजकीयदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या उरण विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक २२ उमेदवार आपले भवितव्य अजमावीत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारांच्या वैयक्तिक भेटी, विभागवार छोटय़ा सभा तसेच वातावरण निर्मितीसाठी मोटारसायकल रॅलींवर उमेदवारांनी भर दिलेला आहे. प्रचाराच्या या रणधुमाळीमुळे उरण विधानसभा मतदारसंघाचे रण तापू लागले आहे.
   मतदारसंघ पुनर्रचनेत २००९ला तयार झालेल्या उरण विधानसभा मतदारसंघावर शेकाप-शिवसेना युतीचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र लोकसभा निवडणुकीत शेकाप-शिवसेना युती तुटल्याने दोन्ही पक्षांनी या निवडणुकीपासूनच आपली ताकद अजमावण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेत शेकापने या मतदारसंघात स्वतंत्र लढूनही आघाडी घेतली आहे, तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यामुळे उरण मतदारसंघात शेकाप व शिवसेना यांच्यात चुरस असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत असलेला भाजप आता स्वतंत्र झाल्याने सेनेच्या मतांवर परिणाम झाला आहे, तर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश करणाऱ्या रामशेठ ठाकूर यांच्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये लोकसभा निवडणुकीपासूनच विस्तव जात नव्हता. आता आघाडी तुटल्याने हे दोन्ही पक्षही आता उरण विधानसभा मतदारसंघातून आपली ताकद अजमावीत आहेत.
 उरण विधानसभा मतदारसंघात एकूण सहा प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शेकाप, सेना व काँग्रेस यांच्यातच होणार आहे.