अगोदरच पुतळ्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात आता पुन्हा छत्रपती संभाजीराजे, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यांची भर पडत असून या तिन्ही पुतळ्यांचे अनावरण आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच उरकून घेण्यासाठी महापौर अलका राठोड यांनी जोरदार आटापिटा चालविला आहे.
दरम्यान, अलीकडे लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सोलापूर मतदारसंघात जनसंपर्क वाढविलेले केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे येत्या १४ व १५ फेब्रुवारी रोजी सोलापुरात येत आहेत, तेव्हा घाईगडबडीने या तिन्ही पुतळ्यांच्या अनावरणाचा मुहूर्त काढण्याचे प्रयत्न महापौरांनी हाती घेतल्याचे समजते. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यामुळे अडचण नको म्हणून महापौर अलका राठोड यांनी छत्रपती संभाजीराजे, शंकरराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यांचे अनावरण उरकून पुतळ्यांखालील कोनशिलेवर स्वत:चे नाव कोरून घेण्याची खटपट चालविल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
विजापूर रस्त्यावर नेहरू नगर परिसरात बहुसंख्येने लमाण समाज राहत असलेल्या भागात वसंतराव नाईक यांचा अर्धपुतळा २० वर्षांपूर्वी बसविण्यात आला होता. परंतु हा पुतळा अर्ध नको तर पूर्णाकृती असावा म्हणून लमाण समाजाच्याच असलेल्या महापौर अलका राठोड यांनी पुढाकार घेतला आणि नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. सध्या या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे दिसून येते. तर डफरीन चौकात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य निवासस्थानाच्या कोपऱ्यातील दर्शनी भागात शंकरराव चव्हाण यांचा पुतळा उभारून दोन वर्षे होत आली. परंतु या पुतळ्याचे अनावरण होण्यास मुहूर्त सापडत नाही. मुंबईतील आदर्श घोटाळ्यात शंकररावांचे पुत्र, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे अडकल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापुरात शंकरराव चव्हाण पुतळ्याची उभारणी मुळातच रखडली होती. परंतु नंतर उशिरा पुतळा उभारण्यात आला.  गेल्या डिसेंबरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शंकररावांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा घाट घालण्यात आला होता. परंतु ऐनवेळी तो स्थगित केला गेला. तर, पुणे रस्त्यावर जुन्या पुणे चौत्रा नाक चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी शिवप्रेमींनी लावून धरली होती. त्यानुसार चबुतरा उभारून नंतर तीन महिन्यांपूर्वी या भागात संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला. आता या तिन्ही पुतळ्यांचे अनावरण उरकून घेण्याची घाई महापौर अलका राठोड यांनी सुरू केल्याचे दिसून येते.