पावसाळा सरल्यानंतर येणाऱ्या कोजागरी अर्थात शरद पोर्णिमेचे महत्त्व यावर्षी कैकपटीने वाढले असून मंगळवारी साजऱ्या झालेल्या या पोर्णिमेचे कवित्व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुढील आठवडाभर राहणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सोमवार, मंगळवारी पडलेल्या पावसामुळे मंगळवारी रात्री उशिरा आकाश निरभ्र होऊ न शकल्याने अनेकांना कोजागरीचा आनंद घेता आला नाही. त्यात पाच दिवसांची सुट्टी संपवून कामावर गेलेल्या चाकरमान्यांनी ही कोजागरी शनिवार-रविवारी साजरी करण्याचे बेत आखले आहेत. त्यामुळे कोजागरी साजरी करणाऱ्या सोसायटय़ांमध्ये पुढील आठवडाभर मतदारांना कोण जागर्ति असे विचारण्यास लक्ष्मीऐवजी उमेदवार येणार आहेत. राज्यातील विधानसभा आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सव काळात होल्डिंगद्वारे आपली शायनिंग प्रतिमा पूर्ण करून घेतली. त्यानंतर चार दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे उमेदवारांच्या खर्चावर बंधने आल्याने नवरात्रोत्सव काळात उमेदवारांच्या छबी दिसल्या नाहीत. त्यावर शक्कल लावताना अनेक उमेदवारांनी आपल्या मुला-मुलींचे फोटो लावून नवरात्रोत्सव साजरा केला. नवरात्रोत्सव काळात अनेक मंडळांना भेटी देऊन उमेदवारांनी स्वत:चा प्रचार केला. नवरात्रोत्सवानंतर आलेल्या दसरा सणाचेही प्रचारासाठी सोने करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी पार पडलेल्या कोजागरी पौर्णिमेचा प्रचारासाठी वापर करण्यात येत असून मतदानाच्या एक दिवस अगोदपर्यंत कोजागरी सप्ताह साजरा केला जाणार असल्याचे दिसून येते. अनेक उमेदवारांनी सोसायटीच्या टेरेसवर मंगळवारी कार्यकर्त्यांची दूध पिण्याची सोय केली होती, पण आकाशात ढगांचे मळभ दाटल्याने आणि रात्री उशिरापर्यंत मोकळे न झाल्याने चंद्राचे दर्शन झाले नाही. त्यामुळे हिरमुसलेल्या कार्यकर्त्यांनी कोजागरी पुन्हा साजरी करण्याचे बेत आखले असून उमेदवारांकडून रसद घेतली आहे. त्यासाठी शनिवार-रविवार दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. कोजागरी आणि प्रचारगिरी असा दुहेरी हेतू या कार्यक्रमांच्या मागे आहे. ऐरोली, बेलापूर मतदारसंघांतील अनेक सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांनी सुट्टीचे दिवस म्हणून शनिवारी कोजागरी पोर्णिमेची आखणी केली असून त्या भागातील इच्छुक उमेदवार या कोजागरी कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. बेलापूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी याला दुजोरा दिला. कोजागिरीच्या दिवशी हिंदी मराठी गाण्यांचे वाद्यवृंद ठेवले आहेत. कोजागरी पोर्णिमेला लक्ष्मी कोण जागर्ति (कोण जागे आहे) असा प्रश्न विचारते अशी अख्यायिका आहे. यावेळी उमेदवार मतदारांना कोण जागे आहे असे विचारणार असून सोसायटीतील कार्यकर्त्यांना लक्ष्मीदर्शनही घडविणार असल्याचे दिसून येते.