जिल्हा परिषदेत निमंत्रणपत्रिकेवरून सुरू झालेल्या मानापमान नाटय़ाच्या दुसऱ्या अंकात शुक्रवारी अध्यक्ष नाहिदाबानो पठाण यांच्या पतिराजांनी जिल्हा परिषदेतील वीज कर्मचारी कल्याण ढोरकुले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यशवंतराव चव्हाण तैलचित्र अनावरण कार्यक्रमात अध्यक्षांच्या हाती दिलेला माईक बंद होता, याचा वचपा काढताना ढोरकुले यांना सकाळी ११ वाजता बेदम मारहाण झाली. दरम्यान, या प्रकाराची जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटली. दुपारनंतर या सर्व कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी दिला. उद्यापासून (शनिवार) होणाऱ्या आंदोलनात पंचायत समितीचे सदस्यही सहभागी होणार आहेत.
सकाळी अकराच्या दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहायक हिरे यांनी कल्याण ढोरकुले यांना दालनात बोलावून घेत बंद माईक का हातात दिला, अशी विचारणा ढोरकुले यांना करण्यात आली. माईकखराब होता. तो बंद नव्हता, असे ढोरकुले यांनी सांगितले. परंतु माईक खराब असल्याबाबतची तक्रार ढोरकुले यांनी अभियंत्यांकडे केली होती. मंत्र्यांसमोर अध्यक्ष-उपाध्यक्षांची शाब्दिक चकमक सुरू होती. तेव्हा माईक बंद पडल्याचे कारण देत ही मारहाण झाली. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेतील वातावरण तणावपूर्ण बनले.
 कर्मचाऱ्यांनी काम बंद करून ठिय्या आंदोलन करत ढोरकुले यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. घडलेल्या प्रकाराबद्दल कर्मचाऱ्यांसह जाऊन ढोरकुले यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फेरोज पठाण यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.