यंत्रमागासाठी १ रुपये ८० पैसे प्रति युनिट असा असणारा दर जानेवारी २०१३ पासून कायम राहील, असे ठोस आवासन राज्याचे ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिले. याबाबतची लक्षवेधी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह डॉ. सुजित मिणचेकर, रशिद ताहिर मोमीन, रु पेश म्हात्रे, विजय देशमुख, सदाशिव पाटील, जयकुमार गोरे, शिरीषकुमार कोतवाल, अबु आझमी, सुनील केदार, प्रणिती शिंदे  यांनी उपस्थित केली होती.    
गत चार महिन्यांपासून महाराष्ट्रातील यंत्रमागासाठी आकारण्यात येणाऱ्या वीजदरात वाढ झाली आहे. ही वाढीव वीज दरवाढ यंत्रमागधारकांना न सोसणारी आहे. मंदी व कामगारटंचाई यामुळे मेटाकुटीला आलेला यंत्रमाग उद्योग कसाबसा टिकून राहिला आहे. अशा स्थितीत वीज दरात झालेली प्रचंड दरवाढ न भरण्याच्या मनस्थितीत यंत्रमाग कारखानदार आहेत. शिवाय काही कारखानदारांनी दर परवडत नाही म्हणून वीज बिलच भरलेली नाहीत. त्यामुळे येत्या चार-आठ दिवसांत वीज कंपनीने कारखानदारांचे वीज कनेक्शन तोडले तर, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर होईल. या बाबीकडेही आमदार हाळवणकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत याच विषयी जून २०१२ मध्ये यंत्रमागधारक संघटनांची बैठक झाली होती. या बैठकीत अजित पवार यांनी आपण लवकरात लवकर निर्णय घोषित करू असे आवासन दिले होते. तदनंतर २१ ऑक्टोबर रोजी ऊर्जामंत्री टोपे यांनीही या प्रश्नी आपण लक्ष घालू व लवकरच तोडगा काढू असे आश्वासन दिले होते.
यंत्रमागासाठी लघुदाब घटक अशी वेगळी कॅटेगिरी महाराष्ट्र शासन लावणार का? तसेच कोणताही टॅक्स न आकारता १ रुपये ८० पैसे या दराने यंत्रमागाला वीज पुरविणार का? अशी विचारणा आमदार हाळवणकर यांनी केली असता, मंत्र्यांनी यंत्रमागासाठी वेगळी कॅटेगिरी करण्यासाठी वीज आयोगाकडे प्रयत्न केले जातील तसेच १ रुपये ८० पैसे इतका वीजदर जानेवारी महिन्यापासून राज्य सरकार यंत्रमागांसाठी आकारणी करेल, असे उत्तर मंत्री टोपे यांनी दिले. या लक्षवेधी सूचनेवर संलग्न असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, तसेच भिवंडीचे आमदार रशिद ताहीर मोमीन यांनी उपस्थित केला.