वितरण व्यवस्था सक्षम करून विजेची गळती आणि चोरी टाळण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे महावितरण वाढत्या जनित्रांच्या चोऱ्यांमुळे हैराण झाले आहे. विशेषत: कल्याण परिसरात रोहित्रे चोरी होण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे ग्रामीण भागात सलग तीन-चार दिवस अंधारात राहण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी जबाबदारी घेतली तरच नवे रोहित्र देण्याच्या निर्णयाप्रत महावितरणचे अधिकारी आले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. गेल्या सव्वा वर्षांत ६६ रोहित्रे चोरीला गेली असून महावितरणच्या वतीने पोलीस ठाण्यात रीतसर तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात भारनियमन आणि पावसाळ्यात वाऱ्या वादळामुळे ग्रामीण भागात आधीच विजेचा लपंडाव सुरू असतो. आता रोहित्रांच्या चोऱ्यांमुळे ग्रामीण भाग अंधारात बुडू लागला आहे.
तीन दिवसांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळील अस्नोली गावातील रोहित्राची चोरी झाली. त्यामुळे गेले तीन दिवस हे गाव अंधारात आहे. एका रोहित्रावर साधारण साठ ते सत्तर घरांना वीजपुरवठा होतो. त्याची किंमत साधारण तीन लाख रुपये असते. भंगारातही विकले तरी त्याचे दीड ते दोन लाख रुपये मिळत असल्याने गावापासून दूर असणारी रोहित्रे चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. वीजपुरवठा सुरू असताना रोहित्रे काढून नेणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. याविषयातील तज्ज्ञ व्यक्तीच हे काम करू शकतात. त्यामुळे वीजजोडणी अथवा दुरुस्तीची कामे करणाऱ्या काही खासगी ठेकेदारांचा यामागे हात असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. गावाबाहेर असणारी रोहित्रे वस्तीजवळ आणून ग्रामस्थांनीच त्यांची राखण करावी, अशी भूमिका महावितरणने आता घेतली आहे. त्याअनुषंगाने ग्रामस्थ जबाबदारी घेणार असतील, तरच नवीन रोहित्रे बसविली जाणार आहेत.   
गेल्या आर्थिक वर्षांत कल्याण, मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथ तालुक्यांत विविध ठिकाणांहून ५६ रोहित्रे चोरीला गेले. चालू आर्थिक वर्षांत पहिल्या तिमाहीतही हे सत्र सुरूच असून आतापर्यंत दहा रोहित्रे चोरीला गेली आहेत.