यवतमाळ विधानसभेची पोटनिवडणूक कॉंग्रेस पक्ष भावनिक आधारावर, तर भाजप वीज भारनियमन, महागाई, बेकारी इत्यादी मुद्दय़ांवर लढत असल्याचे चित्र दिसत आहे. कॉंग्रेसने नंदिनी पारवेकर यांना, तर भाजपने मदन येरावार यांना उमेदवारी दिली आहे. नंदिनी पारवेकर पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत, तर मदन येरावार अनुभवी उमेदवार आहेत. विशेषत रा.स्व.संघाचे कॅडर त्यांच्या दिमतीला तयार आहेत. आíथकदृष्टय़ाही ते संपन्न आहेत.
ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दोनदा येरावारांनी मतदार संघ िपजून काढला होता. शिवाय, निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली होती. याचा अर्थ उमेदवारी आपल्यालाच मिळणार, याचे संकेत त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिले होते, हे उघड आहे. २००९ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून पराभूत झालेले बाबासाहेब गाडे पाटील आता भाजपामध्ये आले असून त्यांनी मदन येरावार यांच्या निवडणुकीची धुराही सांभाळलेली असल्यामुळे त्यांना आपले पारडे जड झाल्यासारखे वाटत आहेत. आणखी असे की, याच निवडणुकीत अपक्ष उमेदवार बाळासाहेब चौधरी हे मुळात भाजपचे नगराध्यक्ष होते. मात्र, बंडखोरी करून त्यांनी मदन येरावारांविरोधातच अपक्ष म्हणून निवडणूक लढवून २६ हजारावर मते घेतली होती. ती भाजपाचीच होती, असा भाजपाचा दावा आहे. त्यामुळे बाळासाहेब चौधरी हे आता कॉंग्रेसमध्ये गेले असले तरी त्यांना २००९ मध्ये मिळालेली मते कॉंग्रेसलाच मिळतील, असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल, असाही भाजपा नेत्यांचा दावा आहे.
दुसरीकडे नंदिनी पारवेकर यांना सहानुभूतीचा लाभ तर मिळेलच उलट, मतदार संघातील अपूर्ण राहिलेल्या विकास कामाची पूर्तता करण्याची संधी मतदार देतील, या विश्वासाने कॉंग्रेसने नंदिनी यांना उमेदवारी दिलेली आहे. नंदिनी पारवेकरांच्या विजयासाठी कॉंग्रेसने केलेल्या जाहीर नम्र निवेदनात विकास कार्याऐवजी किंवा नीलेश पारवेकरांनी केलेल्या साडेतीन वर्षांच्या कामाच्या आढाव्याऐवजी मतदारांच्या भावनांना स्पर्श केला आहे. नंदिनी पारवेकर यांना मतदान करून खऱ्या अर्थाने नीलेश पारवेकरांना श्रध्दांजली अर्पण करण्याचे भावनिक आवाहन कॉंग्रेसने केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, ज्या ठिकाणी नीलेश पारवेकर यांचे अपघाती निधन झाले त्याच जागेवरून नंदिनी पारवेकर यांनी निवडणूक प्रचाराचे पहिले भाषण करून मतदारांची सहानुभूती मिळवली. जातीयवादी सांप्रदायिक शक्तींना दूर ठेवून राष्ट्राच्या विकासात सहभागी होण्यासाठी कॉंग्रेसला मते द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या पोटनिवडणुकीत १० उमेदवार िरगणात असले तरी खऱ्या अर्थाने कॉंग्रेसच्या नंदिनी पारवेकर आणि भाजपचे मदन येरावार यांच्यातच लढाई आहे. मात्र, ही लढाई उमेदवाराच्या दृष्टीने विषम असल्याचे दिसून येते. मदन येरावार दोनदा विजयी व दोनदा पराभूतही झाले आहेत. यावेळी पाचव्यांदा ते लढत असून आपली ही शेवटचीच लढाई असल्याचे ते खाजगीत सांगतात. जाहीररित्या त्यांनी ही बाब स्पष्ट केली नसली तरी शेवटची लढाई हे त्यांचे भावनिक आवाहनच आहे. त्या दृष्टीने नंदिनी येरावार यांचा विचार केल्यास त्यांना सासर आणि माहेर, असा दोन्हीकडून राजकीय वारसा मिळालेला असला तरी स्वत मात्र प्रत्यक्ष राजकारणात त्या कधीच नव्हत्या. नियतीने त्यांच्यावर पहिल्यांदाच निवडणूक आखाडय़ात उतरण्याची वेळ आणली आहे आणि समर्थपणे आपण ही निवडणूक लढवू, असा विश्वास त्यांनी राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि निवडणुकीची जबाबदारी सांभाळत असलेले सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना दिला आहे.
रखरखत्या उन्हाची परवा न करता भाजप व नंदिनी पारवेकरांचाही प्रचार सुरू आहे. आपल्या प्रचारासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील कोणते नेते येणार, याची त्यांना प्रतीक्षा आहे.