माझे शहर स्वच्छ शहर, माझी जबाबदारी या संकल्पनेतून महापालिकेने आणि जिल्हा परिषदेने अनेकदा शहरातील आणि जिल्ह्य़ातील विविध भागात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्याची मोहीम राबविली असली तरी आजही शहरात आणि जिल्ह्य़ात विविध भागात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात आणि त्यावर कुठलीच कार्यवाही होत नसल्याचे चित्र दिसून येते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर निवडणुकीच्या धामधुमीत महापालिका आणि जिल्हा परिषदेतील प्रशासन आणि पदाधिकारी कामाला लागले असले तरी शहरात आणि जिल्ह्य़ात अनेक गावांमध्ये आणि शहरातील वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहेत. दोन दोन दिवस शहरातील अनेक भागात कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शहरातील १० झोनमध्ये कचरा जमा करण्यासाठी किमान पाच ते सहा सिमेंटचे चबुतरे तयार करण्यात आले आहे. शिवाय अनेक ठिकाणी कचरा पेटी लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यात जमा करण्यात आलेला कचरा रोजच्या रोज उचलणे आवश्यक असताना तो उचलला जात नाही त्यामुळे दुर्गंधी पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील अनधिकृत ले आऊट्समध्ये कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. महापालिका प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. प्रारंभी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे शहरातील विविध भागात कचरा उचलण्याची जबाबदारी देण्यात आली होती. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर कचरा उचलण्यासाठी एका खासगी संस्थेकडे जबाबदारी देण्यात आली आहे.  शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट २००९ मध्ये कनक र्सिोसेस कंपनीला देण्यात आले असून त्यांच्याशी १० वषार्ंचा करार करण्यात आला होता. त्याप्रमाणे ५ वर्षांचा करार संपल्यानंतर दोन महिन्यापूर्वी पुन्हा त्यांना प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक असल्यामुळे ती महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. कंपनीला शहरातून दररोज किमान ८०० टन कचरा उचलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक झोनमधे ४ गाडय़ाची कंपनीने व्यवस्था केली आहे मात्र त्या प्रमाणात कचरा उचलला जात नसल्यामुळे विविध वस्त्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. दररोज सकाळी विविध वस्त्यांमध्ये कचऱ्याची गाडी फिरणे आवश्यक असताना अनेक वस्त्यांमध्ये गाडी जात नसल्याच्या तक्रारी आहे. त्यामुळे घरोघरी जमा करण्यात आलेला कचरा दोन दोन दिवस पडलेला पाहतो, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. घरोघरी जमा करण्यात आलेला कचरा उचलण्यासाठी महापालिकेने व्यवस्था केल्यानंतर अनेक लोक रस्त्याच्या एका कोपऱ्याच तो जमा करून ठेवतात त्यामुळे नागरिकांनी याबाबत जागृत राहण्याची आवश्यकता आहे.