ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात राखीव कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिपाई मारुती जाधव यांना मतदानाच्या दिवशी चक्कर आली आणि निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली. निवडणुकीच्या कामाचा ताण असतानाही अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे मारुती जाधव यांचा मेंदूतील रक्तस्राव होऊनही त्यांचे प्राण वाचले.
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिपाई पदावर मारुती जाधव कार्यरत असून त्यांची ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात राखीव कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे या मतदारसंघातील बेडेकर महाविद्यालयामधील मतदान केंद्रावर ते कार्यरत होते. बुधवारी सकाळी मतदानाच्या दिवशी ते महाविद्यालयातील केंद्रावर निवडणुकीच्या कामासाठी आले. मात्र, राखीव कर्मचारी असल्याने त्यांच्यावर कोणत्याही कामाची जबाबदारी सोपविण्यात आली नव्हती. त्यामुळे ते मतदान केंद्रामध्ये इतर राखीव कर्मचाऱ्यांसोबत थांबले होते. या कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी नाश्ता केला आणि काही वेळातच त्यांना चक्कर येऊ लागली. याबाबत जाधव यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी माहिती देताच साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोपळे यांनी त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास सांगितले. त्यानुसार, क्षेत्रीय अधिकारी शैलेंद्र भालेराव आणि निरीक्षक पाठक यांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. तसेच निवडणुकीचे काम बाजूला सारत भोपळेसुद्धा तेथे आले. तेथे प्रकृती चिंताजनक असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी जाधव यांना खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनीही परवानगी देऊ केली. तसेच जाधव यांना उपचाराकरिता दाखल करून घेण्यासंबंधी गिरासे यांनी ज्युपिटर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि  तेसुद्धा निवडणुकीच्या कामाचा ताण असतानाही ज्युपिटर रुग्णालयात आले. या रुग्णालयातील तपासणीमध्ये जाधव यांना मेंदूतील रक्तस्राव झाल्याचे निदान निष्पन्न होताच तज्ज्ञ डॉक्टरांनी त्वरित त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले असून त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने जाधव यांच्यावर उपचार करता आले. त्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करावी न लागता ते बरे झाले. एक प्रकारे हा चमत्कार आहे, असा संदेश डॉक्टरांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविला आहे.

मृत्यूची अफवा..
राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत बुधवारी मतदान सुरू असतानाच ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात राखीव कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिपाई मारुती जाधव यांचा मेंदूतील रक्तस्रावाने मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. तसेच निवडणूक अधिकारी कामात व्यस्त असल्याने याविषयी अधिक माहिती मिळू उपलब्ध होऊ शकली नव्हती. मात्र, त्यांचे प्राण वाचले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वृत्तास निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी दुजोरा दिला आहे.