गेले तब्बल अर्धशतक सातत्याने घंटाळी देवी नवरात्रोत्सवानिमित्ताने शहरात सांस्कृतिक चळवळीचा वारसा जपणाऱ्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या पर्वाचा रसिकांच्या प्रतिसादाअभावी अखेर झाला आहे. नवरात्रोत्सवाकरिता आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने मंडळाने गेल्या वर्षीच उत्सवाचे शेवटचे वर्ष असल्याचे जाहीर केले होते.
ठाणे शहरातील नावाजलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, घंटाळी या मंडळाची स्थापना १९६४ साली योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांनी केली होती. घंटाळी देवी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंडळातर्फे करण्यात येत होते. सांस्कृतिक ठाण्याची ती एक ठळक ओळख होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या मंडळाच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. गाण्यांचा कार्यक्रम वगळता इतर चर्चासत्रे, व्याख्याने, परिसंवाद आदी वैचारिक स्वरूपाच्या कार्यक्रमांकडे रसिक सपशेल पाठ फिरवीत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे गेल्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षांत सांस्कृतिक कार्यक्रमांची ही परंपरा बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला होता. या सुवर्ण महोत्सव वर्षांच्या उत्सवाचा अहवाल व जमाखर्च सादर करण्यासाठी ५ जुलैला सहयोग मंदिरात सर्व कार्यकर्त्यांची सभा झाली. सुर्वण महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाकडे एकूण दहा लाख ४९ हजार रुपये जमा झाले. त्यापैकी दहा लाख २७ हजार रुपये खर्च केले. उर्वरित शिल्लक २२ हजार रुपये घंटाळी मित्र मंडळाला देणगी दिली, अशी माहिती मंडळाचे संयुक्त कार्यवाह गिरीश शेळगीकर यांनी दिली.