शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) विविध समस्या सोडविण्यासाठी ‘क्वॉलिटी सर्कल’ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून मेडिकलमधील अनेक समस्या सोडवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
क्वॉलिटी सर्कलमध्ये निर्देशन, समन्वय, मार्गदर्शन या उपसमित्या स्थापना करण्यात आल्या आहेत. ठरवून दिल्याप्रमाणे या समित्या आपले काम करणार आहेत. मेडिकलमध्ये कचरा व विल्हेवाटीचे नियोजन, भिंतीवरील डाग, वऱ्हांडय़ाची स्वच्छता, स्वच्छतागृहांची साफसफाई आदी समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी क्वॉलिटी सर्कलद्वारे प्रयत्न केला जाणार आहे. या क्वॉलिटी सर्कलची स्थापना अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निस्वाडे यांच्या हस्ते झाली. यावेळी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्य डॉ. लता महतो प्रामुख्याने उपस्थित होत्या. उपसमित्यांना निर्देश देण्याचे काम क्वॉलिटी सर्कल ही मुख्य समिती करणार आहे.
निर्देशन समितीमध्ये मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे.बी. हेडाऊ, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सुभाष ठाकरे, समन्वय समितीत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्य डॉ. लता महतो, डॉ. अपूर्व पावडे, डॉ. तिरपुडे, डॉ. के.एम. कांबळे आणि जोसेफ, तर मार्गदर्शन समितीमध्ये डॉ. ठाकरे, डॉ. तायडे, डॉ. सिद्धीकी, फरतोडे, देवरवाड, फुलझेले, सुंचे, खंडा यांचा समावेश आहे. विभागप्रमुख समितीमध्ये रगडे, रिल, पारसे, गायकी, समुद्रे, सुटे, ब्राम्हणे यांचा समावेश आहे.
या सर्व समित्यांना सूर्योदय, कमल, साथ-साथ, लोटांगण, सहयोग, चकाकी आदी नावे ठेवण्यात आली आहे. क्वॉलिटी सर्कल स्थापन करण्यामागची कल्पना वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सुभाष ठाकरे यांची आहे. क्वॉलिटी सर्कल व त्यातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या उपसमित्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे कामात वेग व जोम येणार आहे. तसेच संघटित होऊन कामात आपुलकी निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.