अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग केंद्राच्या वतीने माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी आदिवासी महिला मेळावा आणि भाऊबीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटीतील पेठ रस्त्यावरील शरदचंद्र पवार बाजार समितीत होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून कार्यक्रमात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या नाशिकच्या अ‍ॅथलीट््ससह महाराष्ट्राच्या विविध भागांत सरकारी नोकरीत राहूनही विशेष कर्तबगारी बजावणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या हजारो आदिवासी महिलांना अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने साडी, चोळी व दिवाळीचा फराळ देण्यात येणार आहे. या अनोख्या भाऊबीज सोहळ्यासाठी सेवामार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे, केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित, पालकमंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांसह राज्यातील आठपेक्षा अधिक मंत्री उपस्थित राहणार आहेत. माजी राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याने प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या तयारीचा आढावा घेण्यात येत असून सेवामार्गाने खास आयोजन समिती तयार केली आहे.
त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठाचे व्यवस्थापक चंद्रकांत मोरे यांनी संपूर्ण राज्यात फिरून सेवेकऱ्यांना या कार्यक्रमाची माहिती दिली.
विविध प्रकारच्या सुमारे ३० समित्यांतर्गत सुमारे दोन हजार स्वयंसेवक कार्य करीत आहेत. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील, साहाय्यक आयुक्त गणेश शिंदे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन सेवेकऱ्यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी काही सूचनाही केल्या. विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांनी तयारीचा आढावा घेतला.
या कार्यक्रमात कविता राऊत, अंजना ठमके, मोनिका आथरे, संजीवनी जाधव या नाशिकच्या आंतरराष्ट्रीय धावपटूंसह आपल्या कर्तबगारीने सरकारी नोकरीची प्रतिष्ठा वाढविणाऱ्या सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, जिल्हा पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवनकर, कोल्हापूरच्या अपर पोलीस अधीक्षक ज्योती सिंग, बीडच्या गटशिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे, यवतमाळच्या उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपवन संरक्षक अनिता पाटील, वध्र्याच्या तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय मूकबधिरांची सेवा करणाऱ्या प्रमिला बोकड, कुष्ठरोगसेवी जिजाबाई शिंदे, गुणवंत विद्यार्थिनी मेधाली देवरगावकर, कीर्तनाद्वारे प्रबोधन करणारे ताराबाई शिरसाठ, आदर्श शिक्षिका वंदना साळुंखे यांनाही गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह सेवामार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.