महापालिका निवडणुकीसाठी बहुतेक सर्वच राजकीय पक्ष आणि आघाडय़ांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना शिवसेनेच्या गोटात मात्र शांतता आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, मनसे, समाजवादी पार्टी तसेच आ. सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडी, कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वातील शहर विकास आघाडी या सर्वानी निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. खान्देश विकास आघाडीने तर इच्छुकांना अर्ज वाटपही सुरू केले आहे. निवडणुकीच्या या तयारीत शिवसेना मात्र कुठेच दिसत नाही. २००८ च्या निवडणुकीत महापालिकेत मनोज चौधरी हे शिवसेनेचे एकमेव उमेदवार विजयी झाले होते. विशेष म्हणजे तेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष आहेत. गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेत शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता असली तरी ती शिवसेनेची म्हणता येत नाही. कारण जैन सेनेचे नेते असले तरी पालिका निवडणुकीत त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेकडून नव्हे, तर खान्देश विकास आघाडीकडून उमेदवारी करतात. असे असले तरी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मात्र पालिकेत आपल्याच पक्षाची सत्ता असल्याचे वाटते.
सद्य:स्थितीत सुरेश जैन हे घरकुल घोटाळ्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईच्या रुग्णालयात त्यांच्यावर काही महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. आमदारांच्या अनुपस्थितीत त्यांचे भाऊ रमेश जैन यांनी खान्देश विकास आघाडीची सूत्रे सांभाळली असून, निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यात शिवसेनेला कोणतेही स्थान नाही. सुरेश जैन कोणत्याही पक्षात असोत (राष्ट्रवादीचा अपवाद वगळता) त्यांनी आघाडीच्या रूपात आपल्या गटाचे वेगळे अस्तित्व कायम ठेवले आहे. महापालिका निवडणुकीत गेल्या वेळी सेना-भाजप यांच्यात युती नव्हती. या वेळीही त्यांची युती होणे अशक्य आहे.
सुरेश जैन हे कोणत्याही पक्षात मनाने नव्हे, तर फक्त शरीरानेच असतात हे त्यांची आजवरची राजकीय पाश्र्वभूमी पाहता स्पष्ट होते. पक्षात राहून पक्षश्रेष्ठींना दूषणे द्यायची या त्यांच्या स्वभावाचा अनुभव काँग्रेस, समाजवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी घेतला आहे. शिवसेना त्यास अपवाद असली तरी गेल्या दोन-तीन वर्षांतील त्यांची तिरकी चाल पाहता ते पुढील विधानसभा निवडणुकांपर्यंत शिवसेनेत राहतात की नाही याबद्दल शंका आहे. अपक्ष विधान परिषद सदस्य मनीष जैन यांना निवडून आणण्यात त्यांची भूमिका, काँग्रेस नेत्यांशी वाढत असलेली जवळीक, मनीष जैन यांच्या जळगावातील कापूस परिषदेत सुरेश जैन यांच्या काही सहकाऱ्यांचा सहभाग, या गोष्टी त्यासाठी पुरेशा ठराव्यात.
दहा वर्षांत महापालिकेत एकही नगरसेवक नसलेल्या काँग्रेसने या वेळी सहयोगी सदस्य असलेल्या   मनीष   जैन  यांच्या    सहकार्याने सर्व जागा   लढण्याची    घोषणा   केली आहे. त्यांना सुरेश जैन यांच्या गटाचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.
अशा स्थितीत महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे नेमके स्थान काय असेल याबद्दल कार्यकर्ते संभ्रमित आहेत. आपली स्वत:ची ओळख कायम ठेवण्यासाठी सुरेश जैन यांच्यावर विसंबून न राहता शिवसेनेने महापालिका निवडणूक स्वबळावर शक्य नसेल तर भाजपशी युती करून लढवावी, असे मत ज्येष्ठ शिवसैनिकांनी मांडले आहे.