निसर्गात दडलेल्या रहस्यांनी प्रत्येकच कलाकाराला कायम आव्हान दिले आहे. कुणी ते शब्दांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला, कुणी सुरांच्या साहाय्याने वेध घेण्याचा प्रयत्न केला तर कुणाला रंगाचा वापर करीत या रहस्याचे पापुद्रे हळुवार उलगडावे वाटले. निसर्गातील हीच गुंतागुंत सोडविण्यासाठी मुद्राचित्रांच्या क्षेत्रातील जागतिक ख्यातीचे भारतीय कलाकार कृष्णा रेड्डी यांनी जाळीदार ग्राफिक्सचा वापर केला व अफलातून काम करून ठेवले आहे. कृष्णा रेड्डींचा हा कलाविष्कार सध्या लक्ष्मीनगरातील शासकीय चित्रकला महाविद्यालयात चित्रप्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
५५व्या राज्य कला महोत्सवादरम्यान हे मुद्राचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. मुद्राचित्रांच्या क्षेत्रात कृष्णा रेड्डी यांनी मूलभूत काम केले असून या कलाप्रकाराला वैचारिक दृष्टी प्रदान केलेली आहे. जाळीदार ग्राफिक्स, रंग, कलादृष्टी व तंत्र यांच्या अभूतपूर्व संयोगातून आकारास आलेली रेड्डी यांची मुद्राचित्रे ही चित्रकलेचा अनोखा अनुभव देणारी आहेत. झिंक प्लेट, शाई, पाणी व आम्लांच्या साहाय्याने तयार होणारी ही चित्रे रंग-रेषांचे अविश्वसनीय विश्व निर्माण करतात. प्लेटवर शाई व आम्ल लावून, पाणी व आम्ल यांच्या योग्य मिश्रणाचा अंदाज घेत, वेळेचे गणित मांडत ही चित्रे कागदावर काढली जातात. कागदावर उमटणारे चित्र हे झिंक प्लेटचे प्रतिबिंब असल्याने त्याचाही अंदाज कलाकाराला घ्यावा लागतो. तसेच, यंत्रावर अवलंबून राहावे लागत असल्याने कलाकाराला अत्यंत संयमाने काम करावे लागते. कला व तंत्र यांच्या अचूक संयोगातून ही चित्रे प्रत्यक्षात येतात. शिवाय, कलाकाराचा अनुभव, कौशल्य व दृष्टी जितकी श्रेष्ठ तितकाच चित्रांचा दर्जाही श्रेष्ठ ठरतो. या सर्व कसोटय़ांवर रेड्डी यांची अमूर्त शैलीतील चित्रे सरस ठरणारी आहेत. मुद्राचित्रकारांचे श्रध्दास्थान असलेल्या रेड्डी यांनी विकसित केलेल्या व्हिस्कॉसिटी तंत्रावर सप्रयोग व्याख्यानेही केली आहेत व मूलभूत कामही केले आहे. या शिवाय, मुद्राचित्रांच्या प्रसार व प्रचारासाठी जगभरात प्रदर्शने करणारे ते आंतरराष्ट्रीय चित्रकार आहेत.
विश्वाच्या पसाऱ्यात मानवाचे स्थान, सृष्टीतील गुंतागुंत, मानवी जीवनाची विविध रूपे, या व अशासारख्या विषयांना रेड्डी यांनी चित्ररूप दिले आहे. आज नव्वदीच्या घरात असलेल्या रेड्डी यांची अगदी सत्तरीच्या दशकापासून ते नव्वदच्या दशकापर्यंतची चित्रे या प्रदर्शनात बघावयास मिळणार आहेत.
भारतीय कलारसिकांना ही चित्रे बघावयास मिळावीत म्हणून मुंबईच्या जे.जे. महाविद्यालयाने प्रयत्न केले. रेड्डी यांनी देखील या प्रयत्नांना दाद दिली व आपली मूळ चित्रे जे. जे. महाविद्यालयाकडे पाठविलीत. या चित्रांची प्रदर्शने आता जे जेच्या वतीने देशभरात करण्यात येत आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बडोदा यासारख्या अनेक ठिकाणी ही प्रदर्शने आजवर करण्यात आली. राज्य कला महोत्सवाच्या निमित्ताने आता नागपूरकर रसिकांना हे आगळे प्रदर्शन बघावयास मिळणार आहे.