सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी येथील महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेच्या महानगरपालिका शाखेचे अध्यक्ष हरिश्चंद्र भोये यांनी आदिवासी विकासचे आयुक्त संभाजीराव सरकुंडे यांच्याकडे दिले आहे.
ऑनलाइन अर्जातील त्रुटी दूर करण्यासंदर्भातही निवेदनात उल्लेख आहे. ही शिष्यवृत्ती पहिली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व किरकोळ खर्च भागविण्यासाठी, गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी, शाळेतील उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. २०१३-१४ पासून सदर योजना ही ऑनलाइन करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर ही अर्ज भरण्याची मुदत होती. अद्याप काही शाळांनी अर्ज न भरल्याने अर्जातील त्रुटीे व मुदतवाढ देण्यासंदर्भात विचार सुरू असून लवकरच लेखी कळविण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त सरकुंडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे बंधनकारक असून ज्या शाळा विद्यार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवतील त्या शाळेतील प्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे सर्व शाळांनी पहिली ते दहावीच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन संघटनेने केलेले आहे.