समविचारी माणसांशी ओळख झाली की मैत्री बहरते, गप्पांचे फड रंगतात. या रंगलेल्या मैफिलीत मग बढाया मारण्याची चढाओढही रंगते. अशाच रंगलेल्या गप्पांच्या फडात एकाने दोन हत्यांची माहिती दिली. चार वर्षे झाली तरी पोलीस आपल्याला पकडू शकले नाहीत, अशी फुशारकीही मारली. पण गप्पा मारत असताना तो एका सापळ्यात अडकत होता, याची त्याला कल्पनाही नव्हती.बोरिवलीत राहणारा संजय शेट्टीगार नावाचा रिक्षाचालक नुकताच तुरुंगातून सुटून आला होता. त्याने पुन्हा रिक्षा चालविण्याचा जुना धंदा सुरू केला होता. त्याच्या रिक्षात दररोज दोन प्रवासी येत होते. शेट्टीगारच्या रिक्षात बसून दररोज काही कामानिमित्त त्याला लांबच्या ठिकाणी घेऊन जात असत. हे दोन प्रवासी गुंड प्रवृत्तीचे होते. त्यामुळे शेट्टीगारची गट्टी जमली. दररोज हे दोन प्रवासी आपण कसे गुन्हे गेले, पोलिसांना कसा चकमा दिला असे सांगून बढाया मारत असत. मग शेट्टीगारला राहावले नाही. त्यानेही सांगितले, तुमचे गुन्हे काय किरकोळ आहेत. मी तर दोन खून केले आणि अजून पोलिसांच्या हाती लागलो नाही. या प्रवाशांना नेमके तेच हवे होते. शेट्टीगारने स्वत:हून केलेल्या दोन हत्यांची कबुली गप्पांच्या ओघात दिली होती. मग या प्रवाशांनी आपले खरे रूप उघड केले. ते प्रवासी नसून मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकातील दोन पोलीस होते. शेट्टीगारवर पोलिसांच्या संशय होता. पण पुरावा नव्हता. त्यामुळे त्याला सापळ्यात अडकविण्यासाठी त्यांनी हा बनाव रचला होता. शेट्टीगार याने शहापूरमध्ये एका खासगी वाहन चालकाची तसेच सांताक्रुझमधील व्यावसायिकाची हत्या करून मृतदेह लोणावळ्यात टाकून दिल्याची कबुली दिली.याबाबत माहिती देताना खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स यांनी सांगितले की, शेट्टीगार हा सराईत गुंड होता. त्याच्यावर आम्हाला संशय होता. पण हाती काहीच पुरावा नव्हता. जर त्याला सरळ आणून चौकशी केली असती तर काहीच हाती लागले नसते. म्हणून अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) के.एमएम प्रसन्ना यांना ही बाब सांगितली आणि पुढची योजना बनवली. ही योजना यशस्वी झाली आणि आरोपी त्यात अडकला.
दोन हत्या..
जुलै २०११ मध्य आरोपी संजय शेट्टीगार आपले दोन साथीदार मोहसीन शेख ऊर्फ मुन्ना आणि शिवकुमार ऊर्फ डिसुझा नटराज शेट्टी यांच्यासह नाशिकला गेला होता. तेथे त्यांच्याकडील पैसे संपले. मग त्यांनी एका वाहनचालकाला लुटण्याचे ठरवले. आरोपींनी एक खासगी गाडी थांबवली. गाडीचालक रघुनाथ आव्हाड याला मुंबईला घेऊन जायला सांगितले. प्रति माणशी शंभर रुपये भाडे ठरले. मात्र शहापूरला त्यांनी आव्हाडचा गळा आवळून हत्या केली. त्याच्याकडील मोबाइल, सोनसाखळी आणि रोख रक्कम असा मिळून ७ लाखांचा ऐवज लुटला. शहापूर महामार्गाजवळील मोखाडी वरसकोड येथे त्याचा मृतदेह टाकून दिला होता. या घटनेच्या काही दिवसांनंतर शेट्टीगारने सांताक्रुझ येथील व्यावसायिक हरीश देढिया याची हत्या केली. शेट्टीगार याचा नातेवाईक शेखर शेट्टीगार याच्या सांगण्यावरून त्याने देढिया याचे अपहरण करून त्याला लोणावळ्यात नेले. तेथे गाडीत त्याचा गळा आवळून त्याचा मृतदेह बॅटरी हिल येथे टाकून दिला. या दोन्ही हत्या संजय शेट्टीगारने सहज पचविल्या होत्या. पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नव्हते; परंतु खंडणीविरोधी पथकाच्या कुशल तपासामुळे या हत्यांची उकल होऊन आरोपी गजाआड झाला. विनायक वत्स यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मेर, सचिन कदम, संजीव धुमाळ, साहाय्य पोलीस निरीक्षक नाटकर, राजू सुर्वे, बनगर आदींच्या पथकाने या दडवलेल्या हत्यांची उकल करून आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.