‘‘गावी मोलमजुरी करून ऱ्हात हुतो. दुष्काळ आला तशी कामं मिळंनाशी झाली. रेशन मिळंनासं झालं. मुलाबाळांना खायला काय घालावं? मग गावच सोडलं..!’’
दुष्काळग्रस्त आशा खुलारे आणि संगीता खुलारे सांगत होत्या. राज्याच्या दुष्काळग्रस्त भागांतून शहरांत होणाऱ्या स्थलांतराला कधीच सुरुवात झाली आहे, त्याचे चित्र आता पुणे शहरातही पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्य़ातील पाथर्डी तालुक्यातून आलेल्या काही कुटुंबांनी नळस्टॉपजवळील राजा मंत्री उद्यानासमोरच्या फुटपाथवर आपला संसार मांडला आहे. गेले तीन महिने ही कुटुंबे या ठिकाणी राहात असून दुष्काळ पडल्यावर कामाच्या शोधात पुण्यात आल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.
या कुटुंबांची गावी शेती किंवा जनावरे नाहीत. मोलमजुरी करून राहणाऱ्यांना दुष्काळ आल्यावर काम मिळेनासे झाले. तेव्हा नाइलाजाने गाव सोडून कामाच्या शोधात त्यांची भटकंती सुरू झाली. पुण्यात येण्यापूर्वी ही कुटुंबे कोल्हापूर आणि सातारा ही गावे फिरून आली आहेत. कुटुंबातील पुरूषांना शहरात रस्ते खोदाईसारखी कामे मिळत असल्याचे आशा यांनी सांगितले. सतत काम मिळण्याची शाश्वती मिळावी, अशी एकमेव अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कुटुंबांत लहान मुलेही आहेत. मात्र, ती
शाळेत जात नाहीत.
स्थलांतरित ते पुणेकर
याच फुटपाथवर गिरीजाबाई सोनवणे खारे दाणे, बॉबी असे खाद्यपदार्थ विकायला बसतात. विशेष म्हणजे, जवळपास चाळीस वर्षांपूर्वी उजनी धरणग्रस्त म्हणून पुण्यात आल्याचे त्या सांगतात. उजनीत गिरीजाबाईंच्या कुटुंबाची जमीन गेल्यानंतर त्यांना पंढरपूरजवळ जमीन देऊ करण्यात येत होती. मात्र तिकडे न जाता त्यांच्या कुटुंबाने पुण्यात स्थलांतर केले. फुटपाथवरच लहान-मोठे व्यवसाय करता करता आता त्या पुण्यातच स्थायिक झाल्या आहेत. जवळच्या वस्तीत त्यांचे कुटुंब राहत आहे.