उसाला रास्त भाव जाहीर करण्यासाठी शेतकरी संघटनांनी दिलेली अंतिम मुदत आज ३० ऑक्टोबरची राहिल्याने कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जलद कृतिदलासह चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, ठिकठिकाणी शेतक-यांनी निदर्शने व घोषणाबाजी करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. शेतकरी संघटनेने आपल्या भूमिकेचे निवेदन तहसीलदारांकडे सादर केले.
ऊसदरासंदर्भात शेतक-यांच्या हितार्थ व लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कराड तालुक्यातील कार्वे व विंग येथे शेतक-यांनी जोरदार निदर्शने केली. त्यात पोलिसांनी कार्वे येथे १२ जणांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तर, विंग येथे आंदोलन करणाऱ्या ११ जणांना समज देण्यात आली आहे. शेतक-यांची ठिकठिकाणी निदर्शने झाली. मात्र, सर्वत्र शांततेचे वातावरण होते असे कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन जगताप यांनी सांगितले.