कोटय़वधींचा मोबदला दिला तरी गुंठाभरही जमीन देणार नाही असा अक्रमक पवित्रा घेत वाघुंडे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी औद्योगिकरणासाठी शेतजमिनी देण्यास प्रखर विरोध नोंदवला.
सुपे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी तालुक्यातील वाघुंडे बुद्रुक, अपधूप, बाबुडी, पळवे तसेच म्हसणे येथील शेतजमिनींचे संपादन करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना यापुर्वीच नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर संभाव्य औद्योगिक संपादनाचे शिक्केही मारण्यात आले आहेत. संपादन करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असून शेतजमिनीचा भाव ठरविण्याबाबत मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात वाघुंडे बुद्रुक येथील शेतकऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. गावातील २८५ हेक्टर शेतजमीन औद्योगिकरणासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे.
या बैठकीची नोटीस प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी या शेतकऱ्यांनी आमदार विजय औटी यांची भेट घेऊन या प्रश्नी तोडगा काढण्याची विनंती केली. औटी यांनी शेतकऱ्यांना धीर देत हरकती नोंदविण्यास सांगितले. गटागटाने हरकती नोंदविण्यापेक्षा संघटीतपणे हरकती नोंदवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
सोमवारी सायंकाळी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भुसंपादनास संघटीतपणे विरोध करण्याचा निर्णय घेतला. औटी यांच्या सल्ल्यानुसार मंगळवारी सकाळी ग्रामसभा घेऊन औद्योगिकरणासाठी शेतजमिनी न देण्याचा ठराव करण्यात आला. ग्रामसभेनंतर सर्व शेतकऱ्यांनी संघटीतपणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ग्रामसभेचा ठराव, शेतकऱ्यांचे एकत्रित निवेदन तसेच प्रत्येक शेतकऱ्याची स्वतंत्र हरकतीही नोंदवल्या.