ऑक्टोबर हिटचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला असला तरी थंडीचा बहर मात्र अजूनही वाट पाहावयास लावत आहे. दुसरीकडे वीज प्रश्नानेही बहुतेक ठिकाणी डोके वर काढले आहे. सततच्या भारनियमनामुळे शेतकरीवर्ग चांगलाच त्रस्त झाला असून, नियमित बिल भरूनही पुरेशा दाबाने वीजपुरवठा केला जात नसल्याने संतापात भर पडत आहे. याचाच उद्रेक आता मोर्चा, आंदोलनातून दिसून येत आहे. या पाश्र्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शहरात वीजप्रश्नी मोठा मोर्चा काढण्यात आला. मोर्चास चांगला प्रतिसाद मिळाला.
खुलताबाद व गंगापूर तालुक्यातील शेतकरी, शालेय विद्यार्थी व महिला या मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. बैलगाडय़ांसह अन्य वाहनांची गर्दीही या वेळी लक्ष वेधून घेत होती. कर्णपुरा येथून निघालेला हा मोर्चा मिल कॉर्नर येथील वीज कंपनीच्या कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी लोकांनी विविध घोषणांचे फलक हाती घेतले होते. जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. वीज कंपनीचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांना या वेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डिसेंबरअखेपर्यंत या तालुक्यातील वीजगळतीचे प्रमाण कमी करण्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारीअखेपर्यंत संपूर्ण मतदारसंघ भारनियमनमुक्त करण्यात येईल, असे लेखी आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे आमदार बंब यांनी सांगितले. दीड वर्षांपूर्वी केंद्रीय कायद्यान्वये नियुक्त केलेल्या दक्षता समित्या बरखास्त करण्यात आल्या. त्या पूर्ववत स्थापन कराव्यात. सध्या दहापैकी केवळ तीन समित्या कार्यरत आहेत. मात्र, समित्या अस्तित्वात नसल्याने वीज कंपनीच्या कारभारात विस्कळीतपणा व भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येत्या काळात १० आमदारांची एकत्रित समिती नेमावी, अशी मागणीही आमदार बंब यांनी या वेळी केली.
खुलताबादच्या सभापती लीलाताई पवार, उपसभापती दिनेश अंभोरे, नगराध्यक्ष शमीम काद्री बेग, नगरसेवक, जि. प.-पं. स. सदस्य, तसेच गंगापूर बाजार समितीचे सभापती विनोद काळे, उपसभापती नानासाहेब गवळी यांच्यासह शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थी मोर्चात बहुसंख्येने सहभागी झाले होते.