पश्चिम घाटातून पाणी पळविले जाते. नेत्यांनी हे पाणी मराठवाडय़ात आणताना उसाला अधिक मिळावे, असे प्रयत्न केले. त्यामुळे ज्या भागात पाणीटंचाई आहे तेथे ऊस कारखाने आहेत. लातूरसारख्या जिल्ह्य़ात १२ साखर कारखाने हवेत कशाला? ऊस व पाणी यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन पीकरचनेत बदल व्हावा, यासाठी शेतकरी संघटना आंदोलन करेल, असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी यांनी सांगितले.
औरंगाबाद तालुक्यातील आडगाव येथे जोशी यांनी दुष्काळ पाहणी दौऱ्यास प्रारंभ केला. या वेळी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जमिनीत पाणी मुरू दिले नाही, त्यामुळे दुष्काळ निर्माण झाला. नद्या कोरडय़ा पडल्या. पश्चिम घाटातून पाणी पळविले जाते. ते साखर कारखान्यांना दिले जाते. त्यामुळे पीकरचनांमध्ये बदल करण्याच्या अनुषंगाने शेतकरी संघटना आंदोलन करेल, असे त्यांनी सांगितले. पाण्याचा समग्र उपयोग लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. साखर कारखान्यांसाठी पाणी पळविण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यांनी केले. ज्या-ज्या देशात ऊस पिकविला जातो, तेथे पावसाचे पाणी वापरले जाते. केवळ भारतातच कालव्याने पाणी देऊन ऊस जगविला जातो. कोकणात अथवा ईशान्य भारतात ऊस पिकविला गेला असता तर वाईट वाटले नसते. पण ज्या भागात पाण्याचे आधीच दुर्भिक्ष्य आहे, तेथे ऊस घेतला जातो. हे चुकीचे असल्याने पीकरचनेत बदल करण्याच्या अनुषंगाने शेतकरी संघटना आंदोलन करेल. अशा वेळी शासनकर्ते मदत करतीलच असे नाही. कारण शेतीचे मूळ दुखणे शेतीमालाला भाव नसण्यामध्ये आहे. शेतमालाला योग्य किंमत मिळाली तर बाकी काही करण्याची गरज नाही. सध्याची स्थिती गंभीर असून एवढय़ा वर्षांत एवढी भयानक स्थिती मी कधी विदर्भातही पाहिली नाही, असेही जोशी यांनी सांगितले. दुष्काळासाठी दिले जाणारे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी विश्वंभर हाके, रामराव लोखंडे, जयाजीराव सूर्यवंशी यांची भाषणे झाली.