शहरातील रासबिहारी स्कूलने शासनाची मान्यता न घेता एप्रिल २०१२ मध्ये केलेली प्रचंड शुल्कवाढ शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली पालकांनी केलेल्या प्रदीर्घ आंदोलनानंतर शिक्षण उपसंचालकांनी वार्षिक पाच हजार रूपयांनी कमी केली आहे. २०११-१२ मध्ये वार्षिक २२,८०० असणारे शुल्क शाळेने ३७,२०० रूपयांपर्यंत नेले होते. आता शिक्षण उपसंचालकांच्या निर्णयानंतर हे शुल्क ३२ हजार २२५ पर्यंत आणण्यात आले आहे. शुल्कवाढी विरोधात शहरातील पालकांना एकत्र करण्यासाठी मंचने गुरूवारी पालकांच्या बैठकीचेही आयोजन केले आहे.
शाळेने केलेल्या शुल्क वाढीला शासनाकडून मान्यता घेण्यात आलेली नव्हती. या विरोधात पालकांनी एप्रिल २०१२ पासून शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले होते. शासनाच्या विविध स्तरांवर या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. या प्रकरणी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी नेमलेल्या चौकशी समितीने ‘शाळेचे शुल्क फारच जास्त प्रमाणात आहे’ असा स्पष्ट अभिप्राय आपल्या अहवालात दिला होता. तसेच शुल्क प्रस्तावाची पडताळणी करताना कार्यालयातील लेखाधिकाऱ्यांकडून लेखा परीक्षण करून घेऊन शुल्क मान्यतेबाबत निर्णय घेण्यात यावा असे सुचविले होते. या अहवालावर कारवाई करत विभागीय उपसंचालक कार्यालयातील कार्यबळ गटामार्फत शाळेच्या शुल्क प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शाळेचे वार्षिक शुल्क ३७ हजार २०० ऐवजी ३२ हजार २२५ रूपये एवढे मंजूर करण्यात आले आहे. रासबिहारी शाळेचे शुल्क पाच हजार रूपयांनी कमी होणे हे पालकांच्या आंदोलनाचे यश आहे. मात्र, हे शुल्क शाळेचा हिशेब काटेकोरपणे तपासल्यास अजूनही कमी होणे आवश्यक असल्याचे मत पालक व शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने मांडले आहे. यासाठी मंचाने उपसंचालकांना पत्रही दिले असून चौकशीसाठी शाळेकडून मिळालेली शुल्कवाढीच्या प्रस्तावाची प्रत आणि हिशेबाची सर्व कागदपत्रे पालकांना मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शुल्क वाढी विरोधातील लढा मंचाकडून अधिक तीव्र करण्यात येणार असून या संदर्भात शिक्षण संचालकांकडे दाद मागितली जाणार आहे. शहरातील ७८ खासगी शाळांपैकी केवळ दोनच शाळांनी शासनाकडून शुल्काची मान्यता घेतली असल्याचे यापूर्वीच पालिकेच्या शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. या पाश्र्वभूमीवर, शुल्क वाढी विरोधात पालकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात सात फेब्रुवारी रोजी रासबिहारी शाळेजवळील औदुंबरनगर येथे पालकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे मंचने म्हटले आहे. पालकांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन पालक संघटना व मंचने केले आहे.