वन्यप्रेमींसाठी नववर्षांची सुरुवात दु:खद घटनेने झाली असून ज्ञानगंगा अभयारण्यात खामगाव, बुलढाणा रोडवरील बोथा गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे एका चार वर्षांच्या बिबटय़ा मादीचा मृत्यू झाला आहे. या मादीच्या पोटातील दोन अर्भकांचाही मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदनाअंती दिसून आले. या घटनेमुळे वन्यप्रेमींमध्ये दु:ख व्यक्त केले जात आहे.
 खामगाव ते बुलढाणा हा मार्ग ज्ञानगंगा अभयारण्यातून जातो. या अभयारण्यात लुप्त होण्याच्या मार्गावर असणारे विविध प्राणी, पक्षी वास्तव करतात, परंतु या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असल्याने अपघातात अनेक प्राण्यांचा आतापर्यंत बळी गेला आहे. शेडुल्य १ मध्ये येणाऱ्या बिबटय़ा हे प्राणीही या अभयारण्यात आहेत. ३१ डिसेंबरला अज्ञात वाहनाच्या धडकेत गर्भवती मादी बिबटय़ा ठार झाली. या अज्ञात वाहनाची जोरदार धडक लागल्यानंतर त्या मादीने रोडपासून शंभर फूट जाऊन आपला प्राण सोडला. सकाळी वन अधिकारी गस्त घालताना रोडच्या कडेने १०० फूट आत जंगलात बिबटय़ा मृतावस्थेत आढळली.
 या मादीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गवळी यांनी शवविच्छेदन केले असता मादीला जोरदार धडक लागल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तसेच तिच्या पोटातील २ अर्भकांचाही मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या बिबटय़ावर वन अधिकाऱ्यांसह तरुणाई फाऊंडेशनच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
 खामगाव-जालना रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरील सर्व वाहनचालक बोथामार्गे बुलढाणा या मार्गाने जाणे-येणे करतात. यामुळे या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक वाढली आहे. या मार्गावरची रात्रीची वाहतूक नांदुरा-मोताळामार्गे बुलढाणा अशी करण्यात यावी, अशी मागणी विविध सामाजिक संस्थांनी यापूर्वीही केली आहे, तसेच बोथामार्गे बुलढाणा मार्गावर वाहनांचा वेग हा ताशी २० कि.मी.पेक्षा जास्त नसावा, या रोडवर हॉर्नचा वापर टाळावा, यासह इतर नियम असतानाही वाहनचालकांकडून या नियमांची पायमल्ली होत आहे, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.