गोंदिया जिल्ह्यातील त्या मादी बिबटय़ाच्या शिकारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या बिबटय़ाच्या शोधासाठी परिसरात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये सतत नर बिबटय़ाची प्रतिमा येत आहे. परिसरातील लोकांनीही त्या नर बिबटय़ाच्या सातत्याने ओरडण्याची माहिती वनखात्याला दिली, तर दुसरीकडे वनखात्याच्या ताब्यातील सव्वा महिन्याच्या त्या पिलावर उपचार सुरू असून त्याचे आरोग्य सुधारत आहे. त्याचवेळी या पिलाला प्राणीसंग्रहालयात सोडण्याचा विचार वनखाते करीत असल्याने वन्यजीवप्रेमींनी मात्र त्याला विरोध केला आहे.
आठ दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील पिपरटोला परिसरात गावकऱ्यांना मलूल अवस्थेतील बिबटय़ाचे पिलू सापडले होते. वनखात्याला त्यांनी माहिती दिल्यानंतर मादी बिबटय़ाच्या शोधासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दुसरे पिलू मृतावस्थेत दिसले. शोधाशोध करूनही मादी बिबटय़ाच्या परिसरात कुठेच खाणाखुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे मचाण उभारून ती येईल, या प्रतीक्षेत वनखात्याचे कर्मचारी आहेत. परिसरात कॅमेरा ट्रॅपसुद्धा लावण्यात आले आहेत, पण त्यात वारंवार नर बिबटय़ाची प्रतिमा येत आहे. दोन दिवसांपूर्वी कॅमेरा तपासण्यासाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांना १५ मिनिटपूर्वीची बिबटय़ाची प्रतिमा त्यात दिसली. त्यातच आता गावकऱ्यांनीही लगतच्याच परिसरात बिबटय़ा सातत्याने ओरडत असल्याचे वनखात्याला सांगितले. त्याच्या एकूणच वर्तणुकीवरून मादी बिबटय़ासाठी त्यांची शोधाशोध सुरू असल्याचे आणि त्यावरून मादी बिबटय़ाची शिकार झाल्याचा अंदाज आहे.
त्याच वेळी सव्वा महिन्याच्या त्या बिबटय़ाचे आरोग्य सुधारत आहे. सध्या त्याला त्याच्या वयानुसार खाद्य पुरवण्यात येत असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल त्याच्यावर उपचार करीत आहेत. मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाचे डॉ. अखिलेश मिश्रा यांचाही सल्ला उपचारादरम्यान घेतला जात आहे. त्यासाठी बिबटय़ाचे छायाचित्र व चित्रफित त्यांना पाठवली जात आहे. त्याच वेळी वनखात्यातील काही अधिकारी त्याला प्राणीसंग्रहालयात पाठवावे का, या विचारात असल्याने वन्यजीवप्रेमींनी मात्र त्याला विरोध केला आहे. त्याला प्राणीसंग्रहालयात पाठवल्यास तो कायमचा पिंजऱ्यात बंद होईल. आत्ताच जंगलात सोडल्यास त्याला इतर प्राणी मारून टाकतील. त्याऐवजी त्याला या ठिकाणीच पिंजऱ्यात ठेवून नैसर्गिक वातावरणात वाढवण्याचा प्रयत्न केला जावा. त्यामुळे त्याला जंगलात सोडणे सहज शक्य होईल.
वाघांच्या बाबतीत हे प्रयोग फारसे यशस्वी झाले नसले तरीही बिबटय़ाच्या बाबतीतील प्रयोग मात्र यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच डॉ. अखिलेश मिश्रा यांनी गोंदिया वनखात्यातील अधिकाऱ्यांना हा सल्ला दिला आहे. डॉ. मिश्रा हे बिबटय़ाच्या पिलाला बघण्यासाठी येत्या एक-दोन दिवसात गोंदियात पोहोचत असून त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.