क्रांतिबा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर    यांच्या   जयंतीनिमित्त डॉ. यशवंत मनोहर यांच्यासह मान्यवरांच्या कविता, तसेच गणेश छत्रे यांनी शिल्पाकृती तयार करून काव्यसंमेलनाची रंगत वाढविली.
डॉ. मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात बशर नवाज, विजयकुमार गवई, खान शमीम खान, प्रकाश घोडके, डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. सुहास जेवळीकर, प्रा. समाधान इंगळे यांनी सादर केलेल्या कविता, तसेच शिल्पकार छत्रे यांनी    साकारलेले  फुले-आंबेडकरांचे  शिल्प या माध्यमातून विषमता,    शोषणाविरुद्ध    लढाईत समता व बंधुत्वाची    अभिनव    ज्योत पेटविण्यात आली. यशवंत मनोहर यांनी प्रतिगामी व धर्माध शक्तींच्या विरोधात सादर केलेली कविता सर्वानाच अंतर्मुख करणारी ठरली.
‘मलाला, तू परत पाठविलेस बंदुकीच्या गोळीला
तू पराभव केलास
वारा अडवू पाहाणाऱ्या मुल्लाशाहीचा
वादळ निकामी करू इच्छिणाऱ्या किनाऱ्यांचा..’
बशर नवाज यांनी दहशतवादाविरुद्ध लढण्याची ऊर्मी जागवली.
‘खौफ सुलगता आँसू बनकर
वक्त की पलकों मे उलझा है
वक्त कडा है, दस्तक देता सूरज दरवाजे पे खडा है..’
डॉ. प्रतिभा अहिरे यांनी परिवर्तनाचा ध्यास गेतलेल्या स्त्रीची गेय ओवी सादर केली.
सोडली आता पोथी
नको भजन, कीर्तन
माझी मालन वाचते
भीमबाचं ‘संविधान’
शमिम खान यांनी आत्मशोधाची कविता पेश केली.
‘मं तो मं हूँ,
अब तो मेरी आँखो मे भी
मेरे अपने ख्वॉब कहा है?
कितनी निंदे सो पाऊँगा,
कितनी आँखे जागूंगा..’
धर्मनिरपेक्ष विचारांना स्पर्श करणाऱ्या हुसेन चाचाची व्यथा डॉ. सुहास जेवळीकरांनी मांडली.
‘राखच राख पसरलेली जिकडे तिकडे,
अस्ताव्यस्त विखुरले होते
जळालेल्या कपडय़ांचे तुकडे
हुसेन चाचाची सुई मात्र कुठेच दिसत नव्हती..’
संमेलनाचे उद्घाटन माजी खासदार उत्तमसिंग पवार यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला डफ वाजवून अमरजित बाहेती, प्रा. इंगळे यांनी सावित्रीबाई फुल्यांचा पोवाडा सादर केला. प्रास्ताविक डॉ. भाऊसाहेब झिरपे व अनिल ताठे यांनी केले.