भंडारा मार्गावरील महालगाव कापसी येथील गणेश कोल्ड स्टोअरेजला बुधवारी पहाटे भीषण आग लागून त्यात लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. एकूण नुकसान १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भंडारा मार्गावरील पारडी जकात नाक्याच्या पुढे महालगाव कापसी परिसरात मुख्य रस्त्यापासून आत चार कोल्ड स्टोअरेज एकमेकांना लागूनच आहेत. त्यापैकी गणेश कोल्ड स्टोअरेजमध्ये पहाटे दोन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. तेथील सुरक्षा रक्षकाला आग लागल्याचे दिसताच त्याने आधी त्याच्या मालकाला कळविल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या पाच गाडय़ा तेथे पोहोचल्या. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीच्या ज्वाळा व धूर आकाशात उंच झेपावत होत्या. आगीचे स्वरूप पाहून आणखी गाडय़ा मागविण्यात आल्या. लकडगंज, सक्करदरा केंद्रासह इतरही केंद्रावरून बारा गाडय़ा तेथे पोहोचल्या.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. तीन मजली विस्तीर्ण कोल्ड स्टोअरेजच्या मागील भागात आग लागली होती. पहाटेचा वारा आणि ज्ललनशील वस्तूंमुळे आग भडभडून पेटली. आगीने तिन्ही मजले कवेत घेतले होते. तेथे अग्निशमन यंत्रणा होती मात्र तिचा काहीच उपयोग होऊ शकला नाही.
सुरुची मसाले कंपनीचे तिखट, मसाले, धने पावडर, लाल मिरच्या तसेच इतर कंपन्यांचा टुथपेस्ट व इतर माल मोठय़ा प्रमाणात ठासून भरला होता. तिखट, मसाला व लाल मिरची जळत असल्याने त्याचा खकाणा वातावरणात पसरला होता. आधीच उन्हाळ्यामुळे होणारा उकाडा, त्यातच आगीची धग व खकाणा, यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागले. याशिवाय तिन्ही मजले पेटल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागली. आग पूर्वेकडील बाजूस लागली होती. वरच्या मजल्यांवरही आग लागली असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रॉलिक क्रेनच्या मदतीने आग विझवणे सुरू केले.
गणेश कोल्ड स्टोअरेजला लागूनच इतर तीन शीतगृहे होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी कौशल्याने आग इतर तीन शीतगृहांकडे पसरू दिली नाही. दिवस उजाडेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविता आले असले तरी दुपापर्यंत पूर्णत: विझली नव्हती. आग कशाने लागली, हे स्पष्ट झालेले नव्हते.
आग लागली त्या शितगृहात  ८-१० व्यापाऱ्यांचा माल होता. याशिवाय त्याच परिसरात असलेल्या इतर तीन शीतगृहातही मोठय़ा प्रमाणात माल भरलेला होता. आग लागल्याचे समजल्यानंतर व्यापाऱ्यांनी तेथे धाव घेतली. इतर तीन शीतगृहांमधील माल बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ सुरू होती. मजुरांना झोपेतून उठवून त्यासाठी आणण्यात आले. आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा तसेच एकूण नुकसान एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात
होता.  
दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळ महापालिका हद्दीबाहेर असल्याच्या कारणाने घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. गणेश कोल्ड स्टोअरेजकडे अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र नव्हते, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. अग्निशमन दलाच्या बारा गाडय़ांनी प्रत्येकी दहाहून अधिक फेऱ्या करून पाणी आणले. दुपारी तीन वाजेपर्यंत आग विझविणे सुरूच होते.