सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने जिल्ह्यात उच्चांकी भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे. गतवर्षी गाळपास आलेल्या उसाला २ हजार २५० रूपयांचा अंतिम दर जाहीर करतानाच चालू हंगामास २ हजार ३५० प्रमाणे अ‍ॅडव्हान्स पेमेंट देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिली.
दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने कार्यक्षेत्रात व बाहेरही उसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, कार्यक्षेत्राबाहेरील उत्पादकांचा विश्वास असल्याने ते थोरात कारखान्यास ऊस देण्यास उत्सुक असतात. भाऊसाहेबांनी घालून दिलेला आदर्श, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे नेतृत्त्व, तसेच काटकसर, उत्कृष्ट नियोजन यामुळे अधिक भाव देणे शक्य झाल्याचे कानवडे म्हणाले. चालू वर्षी उसाची कमतरता असतानाही आतापर्यंत १ लाख ३० हजार मेट्रिक टनाचे गाळप करून १ लाख ३५ हजार साखर पोत्यांची निर्मिती झाली आहे. सरासरी साखर उताराही १०.२८ मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली.